लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून वर्धा बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली असून, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी वर्धा येथील बाजारपेठेत जाऊन पाहणी केली असता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या वांगी, टोमॅटो, कोथिंबीर या भाजीपाल्याला दहा रुपये प्रतिकिलो, तर भेंडी, काकडीला प्रतिकिलो ४ रुपये भाव देण्यात आला. एकूणच सध्याच्या परिस्थितीमुळे विकणारा मालामाल, तर पिकविणाऱ्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.
वर्धेत येणारा आलू-कांदा जिल्ह्याबाहेरील- वर्धा बाजारपेठेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला येत असला तरी येथे येणारा आलू आणि कांदा जिल्ह्याबाहेरूनच येत असल्याचे सांगण्यात आले. रविवारी वर्धा बाजारपेठेत १५० क्विंटल आलू, तर ८८ क्विंटल कांद्याची आवक राहिली. वर्धा बाजारपेठेतूनच तालुक्यातील इतर बाजारपेठेत आलू व कांदा पाठविला जातो.
१ हजार ०३८ क्विंटल भाजीपाल्याची आवक- रविवारी वर्धा येथील बाजारपेठेत एकूण १ हजार ३८ क्विंटल भाजीपाल्याची आवक राहिली. यात अल्पावधीत नाशिवंत होणारा भाजीपाला ८०० क्विंटल, तर १५० क्विंटल आलू आणि ८८ क्विंटल कांद्याचा समावेश आहे. सलग दोन दिवसांच्या सुटीनंतर १७ ऑगस्टला वर्धा बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्रमी आवक होती, हे विशेष.
रविवारी ९० शेतकऱ्यांनी आणला भाजीपाला- नारळी पौर्णिमा म्हणजेच रविवार, २२ ऑगस्टला वर्धा बाजारपेठेत जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ८०० क्विंटल भाजीपाला विक्रीकरिता आणला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाल्याचे चित्र बघावयास मिळाले. भाजीपाला उत्पादकांनाही हमी भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी आहे.
भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठी मेहनत घेत पिकांचे संगोपन करतात. ते वेळोवेळी विविध किटकनाशकांची उभ्या पिकांवर फवारणी करता. या किटकनाशकांचे दर गत वर्षीच्या तुलनेत यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच खतांचे भाव वाढले आहेत. असे असतानाही सध्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत आहे. भाजीपाला पिकाला हमीभाव जाहीर करून त्याला पिकविम्याचे कवच दिले गेले पाहिजे.- बाळकृष्ण माऊस्कर, शेतकरी, नालवाडी.
भाजीपाल्याला मिळालेला भाव (प्रतिकिलो)
वांगी १० ते ११ रुपयेटोमॅटो १० रुपयेभेंडी ४ रुपयेचवळी १० रुपयेढेमस १५ ते २० रुपयेपालक १५ ते २० रुपयेकोथजंबीर १० रुपयेहिरवी मिरची २० रुपयेकाकडी ४ रुपयेपत्ताकोबी १० ते १२ रुपयेफुलकोबी १५ ते २० रुपयेदोडके १० ते १५ रुपये