‘गोनीदां’ची साहित्यसंपदा म्हणजे चमत्कारच
By Admin | Updated: December 12, 2015 04:56 IST2015-12-12T04:56:57+5:302015-12-12T04:56:57+5:30
गो. नी. दांडेकर हे तटस्थवृत्तीचे व परखड प्रवृत्तीचे भक्त बितुल्य साहित्यिक होते. त्यांचे संघर्षमयी जीवन, प्रत्यक्ष

‘गोनीदां’ची साहित्यसंपदा म्हणजे चमत्कारच
संजय इंंगळे तिगावकर : गो. नी. दांडेकरांच्या साहित्यकृतींवर चर्चा
वर्धा : गो. नी. दांडेकर हे तटस्थवृत्तीचे व परखड प्रवृत्तीचे भक्त बितुल्य साहित्यिक होते. त्यांचे संघर्षमयी जीवन, प्रत्यक्ष जीवनानुभवातून साकारलेली आणि सुस्पष्ट विचारांनी प्रेरित असलेली ग्रंथसंपदा म्हणजे एक चमत्कारच आहे. संत गाडगेबाबांच्या प्रत्यक्ष प्रदीर्घ सहवासातून गोनीदांना जीवनोत्कर्षी सेवा भावनेची शिकवण मिळाली. असे विचार येथील विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी व्यक्त केले.
स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयातर्फे स्व. गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. दादासाहेब जासमवार विराजमान होते.
प्रा. विकास काळे यांनी ‘सरस्वती स्तवन’ गायिले. याप्रसंगी आवर्जून उपस्थित असलेल्या गोनीदांच्या मेव्हणी वयोवृद्ध मंदा देसाई यांचा सत्कार ग्रंथपाल शीतल देशपांडे यांनी केला. प्रा. सरोज देशमुख यांनी गोनीदांचे आगळे व्यक्तीमत्व व त्यांचा अर्थपूर्ण साहित्यिक कलाकृतींचा माहितीपूर्ण आढावा सादर केला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गोनीदां लिखित ‘जैत रे जैत’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातील प्रसिद्ध कवी ना.धो. महानोर यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘मी रात टाकली व जांभुळ पिकल्या झाडाखाली’ या दोन गाणी आपल्या मधुर स्वरात डॉ. भैरवी काळे यांनी सादर केले. त्यांना की-बोर्डची साथ आदित्य काळे व तबल्याची साथ प्रा. राम वानखेडे यांनी केली. गीतातील सामूहिक स्वर आकाश कांबळे, शैलेश पंचेश्वर, राहुल सावंत, वै. महंतारे यांनी दिला.
यानंतर गोनीदांलिखित ‘पूर्र्णामायची लेकरं’ या कादंबरीचे प्रा. सरोज देशमुख यांनी केलेले संक्षिप्तीकरण ‘अभिवाचन’ स्वरूपात व स्थानिक सहयोगी कलावंत या संस्थेतील नाट्य साधकांनी अतिशय सादर केले. त्यात प्रा. राजेश देशपांडे, संतोष चोपडे, अरविंद भोसकर, श्रीकांत रोडे, अश्विनी इंगोले, सुषमा ठाकरे, ममता हरणे, छोटा राम चोपडे, या कलावंताचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य जयंत मादुस्कर यांनी केले. कार्यक्रमाला गोनीदां यांची कुटुंबिय मंडळी व साहित्यप्रेमी रसिकवर्ग प्रामुख्याने उपस्थित होता.(शहर प्रतिनिधी)
‘जैत रे जैत’ची गाणी सादर
गोनीदां लिखित ‘जैत रे जैत’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातील प्रसिद्ध कवी ना.धो. महानोर यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘मी रात टाकली व जांभुळ पिकल्या झाडाखाली’ या दोन गाणी आपल्या मधुर स्वरात डॉ. भैरवी काळे यांनी सादर केली. सोबतच गोनीदांच्या संघर्षमयी साहित्यकृतींचा आढावा यावेळी मान्यवरांनी घेतला. शहरातील साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित होते.