रुग्णालयात उपचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST2021-12-31T05:00:00+5:302021-12-31T05:00:20+5:30
काहींच्याच तोंडावर मास्क लावलेला होता. अशीच परिस्थिती ओपीडींच्या ठिकाणीही होती. रुग्णालय परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींपैकी अर्धेअधिक व्यक्ती विनामास्क दिसून आले. रुग्णांसोबत वाॅर्डात असणाऱ्यांसह कार्यरत काही कर्मचाऱ्यांनाही मास्कचा विसर पडला होता. यावरुन नागरिक अद्यापही कोरोना आणि ओमायक्राॅन आजाराबाबत बिनधास्त असल्याने रुग्णालयातूनही ओमायक्रॉनचा धोका संभवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेण्याची गरज आहे.

रुग्णालयात उपचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वातावरणातील बदलांमुळे आजारही बळावले असून, सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने पुन्हा मास्क लावणे, हॅण्डवॉश करणे आणि सोशल डिस्टन्स पाळणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत. पण, जिल्हा सामान्य रुग्णालयातच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळपासून रुग्णांची गर्दी होत असते. गुरुवारी दुपारी येथे पाहणी केली असता, रुग्ण दाटीवाटीने नोंदणी करण्याकरिता रांगेत उभे होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. यावेळी काहींच्याच तोंडावर मास्क लावलेला होता. अशीच परिस्थिती ओपीडींच्या ठिकाणीही होती. रुग्णालय परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींपैकी अर्धेअधिक व्यक्ती विनामास्क दिसून आले. रुग्णांसोबत वाॅर्डात असणाऱ्यांसह कार्यरत काही कर्मचाऱ्यांनाही मास्कचा विसर पडला होता. यावरुन नागरिक अद्यापही कोरोना आणि ओमायक्राॅन आजाराबाबत बिनधास्त असल्याने रुग्णालयातूनही ओमायक्रॉनचा धोका संभवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेण्याची गरज आहे.
ना सोशल डिस्टन्सिंग...
- कोरोनापासून स्वत:ला सावरण्याकरिता सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य आहे. परंतु, निर्बंध हटवल्यानंतर सर्व काही सुरळीत व्हायला लागल्याने नागरिकांनाही सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला. आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला असतानाही चक्क सामान्य रुग्णालयातही या नियमांना वाकुल्या दाखविल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांचे दुर्लक्षच...
- जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाकाळापासूनच जिल्हा शल्य चिकित्सकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. या संदर्भात अनेक तक्रारीही झाल्या आहेत. पण, अद्यापही सुधारणा झालेली नाही. आताही रुग्णालय परिसरात रुग्णासह नातेवाईकांची गर्दी वाढत असून, ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग असाच प्रकार दिसून येत आहे. याकडे लक्ष देत सूचना करण्याची गरज आहे.
ना मास्क...
- घराच्या बाहेर पडताना प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क लावणे आवश्यक आहे. पण, दरम्यानच्या काळात हा मास्क हनुवटीवर आला तर आता तो दिसेनासा झाला आहे. बाजारपेठेसह सामान्य रुग्णालयात गर्दी होत असून, यावेळी नागरिकांकडून मास्क लावला जात नसल्याचेच चित्र दिसून येते.