Goat Market Proposes | ‘गोट मार्केट’चा प्रस्ताव रखडला

‘गोट मार्केट’चा प्रस्ताव रखडला

ठळक मुद्देजागा मिळाली। निधी मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात नव्हे तर राज्यासाठी आदर्श ठरणारा शेळींच्या बाजारपेठ निर्मितीचा विषय सध्या रेंगाळला आहे. तब्बल दोन वर्षानंतर सदर बाजारपेठ कुठे उभारावी यासाठी जागा निश्चित करण्यात आली. शिवाय त्यानंतर १५ कोटींच्या निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला. परंतु, पाठविण्यात आलेल्या या सुमारे ४० पानांचा प्रस्ताव सध्या शासन दरबारी धुळखात असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यप्रणालीवर शेळीपालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. सदर प्रस्तावाला तातडीने गती मिळावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेळीपालकांना आहे.
वर्धा जिल्ह्यात सुमारे २ लाखांच्यावर शेळी आहेत. इतकेच नव्हे तर शेळीपालकांची संख्याही मोठी आहे. अनेक शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय करतात. वर्धा जिल्ह्यात पाहिजे तशी मोठी बाजारपेठ नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तसेच अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी विक्रीसाठी जावे लागते. वर्धा जिल्ह्यातील शेळीपालकांना शेळी विक्रीसाठी जिल्ह्यातच चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी त्या दिशेने पाऊल टाकले. गोट मार्केटसाठी सुरूवातीला शोधत असताना देवळी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला आठवड्यातून एक दिवस देवळीतच जागा उपलब्ध करून देण्यासाठी विचारणा करण्यात आली. परंतु, त्यांनी पुलगाव येथे जागा देतो असे सांगितल्याने देवळी शहराशेजारी शासकीय जागा आहे काय याचा शोध घेण्यात आला. याच शोध मोहिमेदरम्यान कार्यकाळ संपल्याने डॉ. सतीश राजू यांची वर्धा येथून नागपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली.
त्यानंतर गोट मार्केटचा विषय थंडबस्त्यात पडला. परंतु, त्यानंतर एका अधिकाऱ्याने पुढाकार घेत विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असता सुमारे दीड वर्षांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकारने सालोड (हिरापूर) येथे जागा मिळाली. त्यानंतर १५ कोटींचा निधी सदर गोट मार्केटच्या निर्मितीसाठी लागत असल्याने व त्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासन सहज निधी उपलब्ध करू शकत नसल्याने निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव पाठवून सुमारे चार महिन्यांच्यावर कालावधी लोटूनही त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही. इतकेच नव्हे तर कुठलाही लोकप्रतिनिधी त्याविषयी वाच्छता करीत नसल्याने शेळी पालन करून कुटुंबाचा गाढा ओढणाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

देवळीतील जागा निघाली वनविभागाची
सदर गोट मार्केट विदर्भासह महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार असल्याने ही बाजारपेठ देवळी येथे व्हावी अशी इच्छा एका लोकप्रतिनिधीने जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यानंतर देवळी परिसरातील इसापूर येथील एक जागा निश्चित करण्यात आली. परंतु, ती जागा वन विभागाची असल्याने आणि ती सहज मिळत नसल्याचे पुढे आल्याने दुसºया जागेचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आमदार आदर्श गाव असलेल्या सालोड (हिरापूर) शिवारातील महसूल विभागाच्या एका जागेवर जिल्हाधिकाºयांकडून शिक्का मोर्तब करण्यात आला. तेथे गोट मार्केटसाठी २ हेक्टर जागा तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपलब्ध करून दिली आहे.

शाश्वत दर मिळणार
शेळी पालकांना जिल्ह्यातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेळीपालकांचा मोठ्या बाजारपेठेपर्यंत जाण्याचा त्रास कमी होणार असून त्यांना शाश्वत दर मिळणार आहे. इतकेच नव्हे तर गोट मार्केटच्या प्रस्तावात शेळींचा सुसज्य आठवडी बाजार, शेळी प्रजनन केंद्र व पशुविज्ञान केंद्राचा समावेश राहणार असल्याने सदर प्रस्ताव पुर्णत्त्वास गेल्यास वर्धा जिल्हा शेळीपालन व्यवसायासाठी ‘आयडल’ ठरणार आहे.
शेतकरी हित जोपासण्याच्या उद्देशालाच बगल?
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी वर्ध्याची ओळख. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात विशेष उपक्रम राबवून शेतीला पुरक व्यवसायाची जोड देत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आदर्श गोट मार्केटची कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु, सदर विषय सध्या रखडला असल्याने शेतकरी हित जोपासण्याच्या उद्देशालाच बगल मिळत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Web Title:  Goat Market Proposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.