आम्हाला किमान जगण्याइतपत पेन्शन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:38 IST2017-12-29T00:38:07+5:302017-12-29T00:38:24+5:30
भाजप सरकारने निवडून येण्यापूर्वी पेंशनवाढीचे आश्वासन दिले; पण ते अद्याप पूर्ण केले नाही. यामुळे आपल्याला तीव्र लढा देण्यास लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या रामलीला मैदानावर एकत्र होऊन सरकारी झोप उडविण्याशिवाय गत्यंतर नाही.

आम्हाला किमान जगण्याइतपत पेन्शन द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : भाजप सरकारने निवडून येण्यापूर्वी पेंशनवाढीचे आश्वासन दिले; पण ते अद्याप पूर्ण केले नाही. यामुळे आपल्याला तीव्र लढा देण्यास लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या रामलीला मैदानावर एकत्र होऊन सरकारी झोप उडविण्याशिवाय गत्यंतर नाही. आम्हाला किमान जगण्याइतकी पेंशन सरकारने द्यावी व भगतसिंग कोशीयारी अहवालानुसार तीन हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी केली.
स्थानिक माता मंदिर सभागृहात राष्ट्रीय निवृत्त कर्मचारी समन्वयक समिती हिंगणघाटद्वारे पेन्शन धारकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अतिथी म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे, सचिव पुंडलिक पांडे उपस्थित होते. याप्रसंगी डोंगरे यांनी संघटनेच्या स्थापनेपासून झालेल्या वाटचालीचा आढावा घेतला. पेन्शन धारकांच्या किमान पेन्शन वाढीसाठी सरकार दरबारी चालू असलेल्या वाटचालीबद्दल माहिती दिली. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी दिली येथे रामलीला मैदानावर आमरण, उपोषण, आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पांडे यांनी सध्या मिळणाºया पेन्शनमध्ये पती-पत्नीचे जीवन जगणे कसे कठीण झाले आहे, याबाबत अनेक उदाहरणे देत सरकारी कर्मचारी तुपाशी व पेन्शनर उपाशी, अशी वास्तविकता प्रतिपादित केली.
पेन्शन मेळाव्याला मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक रमेश झाडे यांनी केले. संचालन गोपाल व्यास यांनी केले तर आभार गजानन कारामोरे यांनी मानले. मेळाव्याला बाबाराव ठाकरे, गजानन कारामोरे, रमेश झाडे, उमेश पराते, विठ्ठल चनेकार, कापसे आदींनी सहकार्य केले.