कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्या
By Admin | Updated: November 8, 2014 22:42 IST2014-11-08T22:42:26+5:302014-11-08T22:42:26+5:30
विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेरेरचनेनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्यावे व त्यामध्ये शेतीची मर्यादा किमान चार हेक्टर ठेवावी. शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम बोनस

कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्या
रामदास तडस यांचे केंद्र व राज्य सरकारला साकडे
वर्धा : विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेरेरचनेनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्यावे व त्यामध्ये शेतीची मर्यादा किमान चार हेक्टर ठेवावी. शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम बोनस देवून केंद्र सरकारच्या हमीभावामध्ये वाढ करावी, अशी कळकळीची मागणी खा. रामदास तडस यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे.
यासोबतच शेतकऱ्यांचे थकीत असलेल्या कर्जाचे दहा टप्पे पाडावे व ते बिनव्याजी असावे आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वेगळा विचार करून त्यांची शेती सिंचनाखाली आणण्याकरिता प्रयत्न करण्यात यावे, त्याकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे. शेतीची आणेवारी काढताना ५० पैशाच्या आत असावी, कारण सोयाबीनचे एकरी उत्पन्न १ क्विंटल असून कापसाचे एकरी उत्पन्न ५० किलोच्या घरात आहे.
गाव पातळीवर पेरे आढावा घेवून आणेवारी घ्यावी. पावसावर आधारीत पीक विमा योजना असल्याने ग्रामपंचायतीमध्ये पाऊस मोजण्याचे यंत्र असावे, क्रॉप इन्शुरन्स गाव स्तरावर लागू करावी, अशी मागणीही तडस यांनी केली आहे.
ऊस उत्पादकांना ज्या प्रकारे खतासाठी सबसिडी मिळते त्याप्रमाणे कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांनाही सबसिडी देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. या सर्व बाबीकडे शासनाने लक्ष पुरविल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
विदर्भातील पूर्ण खासदार व आमदारांनी सुद्धा या मागण्या लावून धरल्यास सरकारकडून निश्चितच विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.(जिल्हा प्रतिनिधी)