शहीदभूमीला उपविभागाचा दर्जा द्या
By Admin | Updated: March 6, 2015 01:57 IST2015-03-06T01:57:33+5:302015-03-06T01:57:33+5:30
स्वातंत्र्यलढ्यात १९४२ मध्ये बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री बॅँ. ए.आर. अंतुले यांनी १९८२ साली शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा दिला.

शहीदभूमीला उपविभागाचा दर्जा द्या
आष्टी (शहीद) : स्वातंत्र्यलढ्यात १९४२ मध्ये बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री बॅँ. ए.आर. अंतुले यांनी १९८२ साली शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा दिला. मात्र आजही येथे सोयीसुविधांचा अभाव आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने कारंजा तालुक्याला नव्याने उपविभाग दिला. सदर उपविभाग हा आष्टी (श.) तालुक्याला देण्यात यावा, अशी मागणी जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अतिरिक्त मुख्यकार्यपालन अधिकारी प्रमोद पवार यांच्याकडे सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली.
या मागण्यांवर विचार करून कार्यवाही करण्याची सहमती संबंधितांनी दर्शविली आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्वीत आष्टी (श.) व कारंजा (घा.) तालुका जोडलेला होता. यानंतर शासनाने जिल्ह्यात एक नवीन उपविभाग देण्याचा निर्णय दोन वर्षाआधी घेतला होता. मात्र याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही. यातच एक आठवड्यापूर्वी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ यांनी स्थानिक परिस्थिती विचारात न घेताच कारंजा (घा.) तालुक्याला उपविभाग दिला, असे निवेदनात नमुद केले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, लहान आर्वी या तीन सर्कलला कारंजा उपविभागला जोडले. तर तळेगाव सर्कल आर्वी उपविभागाला कायम ठेवले. परंतु आष्टी तालुक्याला कारंजा उपविभाग उलट गैरसोयीचा ठरणारा आहे. आष्टी ही शहीदांची भूमी आहे. म्हणून आष्टीलाच उपविभाग द्यावा, अन्यथा आष्टी तालुका आर्वी उपविभागाला कायम ठेवावे. या मागणीकरिता सर्व सर्कलच्या सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जि.प. सदस्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, सीईओ संजय मीना यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आष्टी (श.) तालुका आर्वी उपविभागाला पूर्वीप्रमाणेच कायम ठेवल्याचे सांगितले. यावेळी माजी जि.प. सदस्य रमेश वरकड, सरपंच संघटना आष्टी तालुका अध्यक्ष प्रभाकर लांडे, सरपंच साहुर वनीता लवणकर, माजी सरपंच साहुर प्रशांत काकपूरे, धाडीचे सरपंच ऋषाली राजु चोरे, लहान आर्वीचे सरपंच सुनील साबळे, भाजयुमो अध्यक्ष गजानन भोरे, वडाळा उपसरपंच मनोज कोकाटे, भारसवाडा सरपंच रेखा लोखंडे यासह आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)