झोपडपट्टीधारकांना स्थायी घरपट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:05 IST2019-02-04T22:05:07+5:302019-02-04T22:05:24+5:30
शहरातील पुलफैल, आनंदनगर, अशोकनगर, तारफैल येथील झोपडपट्टीधारकांनी एकत्र येत राष्ट्रीय सम्बुद्ध संघटनेच्या नेतृत्त्वात स्थानिक पुलफैल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून झोपडपट्टीधारकांना जागेचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी रेटली. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचल्यावर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

झोपडपट्टीधारकांना स्थायी घरपट्टे द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील पुलफैल, आनंदनगर, अशोकनगर, तारफैल येथील झोपडपट्टीधारकांनी एकत्र येत राष्ट्रीय सम्बुद्ध संघटनेच्या नेतृत्त्वात स्थानिक पुलफैल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून झोपडपट्टीधारकांना जागेचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी रेटली. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचल्यावर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
इंग्रज काळात हा संपूर्ण परिसर जनावरे चराईसाठी देण्यात आला होता. परंतु, गौरक्षण मंडळाने ही जागा विकण्याचा आदेश चॅरिटी कमिशनर यांच्याकडून घेऊन सदर जागा विकण्यास सुरूवात केली आहे. सन १०७६ मध्ये चॅरिटी कमिशनर यांनी ही जागा विकता येणार नाही असे स्पष्ट केले होते. परंतु, जागा नंतरच्या आदेशावरून विकल्या जात असल्याचा हा प्रकार पूर्वीच्या आदेशाला बगल मिळत आहे. शिवाय नवीन आदेशानुसार २० पैसे प्रती चौ.फु. विकण्याचे आदेश दिले होते. मात्र, सदर मंडळाकडून १ रुपये दराने जागा विकण्याचा सपाटाच लावण्यात आला. सध्या सर्व नियमावलींना फाटा देत जागा विकण्याचा प्रकार सुरू आहे. ज्या लोकांना जागा विकण्यात आली त्यांना वेगवेगळी आखिव पत्रिका न देता एकाच आखिव पत्रात त्यांची नावे समाविष्ट करण्यात आले आहेत. जागेची मोजणी करणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सदर जागेबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने विचार करून तात्काळ योग्य कार्यवाही करीत तेथील झोपडपट्टीधारकांना कायम स्वरूपी जमिनीचे पट्टे द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनाचे नेतृत्त्व शारदा झामरे यांनी केले. आंदोलनात भास्कर भगत, संजय बघेल, रत्नमाला साखरे, परवीन शेख, राणी मेश्राम, छबु चहांदे, नंदा कुसळे, कविता राऊत, प्रिया गिरी, गीता आडे, सईदा शेख यांच्यासह पुलफैल, आनंदनगर, अशोकनगर, तारफैल येथील झोपडपट्टीधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.