कुशल, अकुशल बेरोजगारांना कंपनीत नोकरी द्या
By Admin | Updated: November 13, 2015 02:07 IST2015-11-13T02:07:25+5:302015-11-13T02:07:25+5:30
लॅन्को थर्मल पॉवर मांडवाच्या वतीने मांडवा, पुलई, बेलगाव व अन्य काही गावांतील जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.

कुशल, अकुशल बेरोजगारांना कंपनीत नोकरी द्या
शेतकरी पुत्रांची मागणी : लॅन्को थर्मल पावरच्या व्यवस्थापनाला निवेदन
वर्धा : लॅन्को थर्मल पॉवर मांडवाच्या वतीने मांडवा, पुलई, बेलगाव व अन्य काही गावांतील जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. यामुळे अनेक शेतकरी पुत्र बेरोजगार झाले. या सुशिक्षित बेरोजगार युवकांना लॅन्कोने कुशल, अकुशल सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भूमिपुत्र संघर्ष समितीने केली आहे. याबाबत विदर्भ लॅन्को थर्मल पावरच्या मुख्य व्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले.
निवेनदनानुसार मांडवा, पुलई, बेलगाव येथील बेरोजगार आयटीआय प्रशिक्षित तरूणांना कंपनीत कायम नोकरी द्यावी, तीन गावातील शिक्षण घेतलेले अभियंते, आयटीआय प्रशिक्षीत युवकांना लॅन्को कंपनीत नोकरी द्यावी, मांडवा, पुलई, बेलगाव येथील कंत्राटदारांना बांधकाम, मजूर पुरवठा ही कामे दिल्यास बेरोजगारी कमी होईल व गावाचा विकास होईल. लॅन्को कंपनी आल्याने मांडवा, पुलई, बेलगाव येथील शेतकऱ्यांची शेती गेली. यामुळे शेतकरी, त्यांची मुले व शेतमजूर बेकार झाले. या अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, गतवर्षी आयटीआय प्रशिक्षित बेरोजगार तरूणांनी आंदोलन केले असता काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे परत घेण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
विदर्भ लॅन्को पॉवरचे काम गत दोन वर्षांपासून बंदस्थितीत होते. आता सुरू झाले आहे. लॅन्को थर्मल परिसरात आल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. हा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता स्थानिकांनी मदत करण्याचे काम केले होते. परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, परिसराच्या विकासाकरिता हातभार लागेल, हे अपेक्षित होते; पण गत काही दिवसांत कंपनी प्रशासन स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. बेरोजगार प्रशिक्षित नाीह, या कंपनीच्या कामाचा अनुभव नाही, की कारणे समोर केली जात आहेत.
कंपनी परिसरात अनेक सुशिक्षित बेरोजगार स्वत: ठेकेदारीचे काम करण्यास तयार असताना व अनुभव असताना त्यांना डावलले जात आहे. कंपनीने हा प्रकार बंद करून बेरोजगारांना नोकरी द्यावी, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही भूमिपुत्र संघर्ष समितीने दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)\
कंपनीकडून बेरोजगारांची थट्टा
या प्रकारामुळे शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या मुलांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे एक हजार एकर शेतजमिनीवर ५०० शेतमजूर काम करीत होते. या जमिनीवर प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने ५०० शेतमजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी प्रशासनाने प्रारंभी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्थानिकांचा रोजगार, गावाचा विकास या प्रश्नांकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
कंपनी प्रशासनाने आश्वासनाप्रमाणे मांडवा, पुलई, बेलगाव येथील १०० बेरोजगार तरुणांना आयटीआय प्रशिक्षण देत रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती; पण वेळ मारून नेली जात आहे. कंपनी प्रशासन बेरोजगारांची थट्टा करीत आहे. मांडवा, बेलगाव, पुलई गावात बी.ई. इंजिनिअरींग, पॉलिटेक्निक, आयटीआय प्रशिक्षित अनेक बेरोजगार उपलब्ध असताना त्यांना डावलून परप्रांतीय युवकांना नोकरी देण्याचे काम सुरू आहे.