दिवाळीपूर्वी थकीत महागाई भत्ता द्या
By Admin | Updated: October 16, 2016 02:03 IST2016-10-16T02:03:32+5:302016-10-16T02:03:32+5:30
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अद्याप देण्यात आलेला नाही. यामुळे पेन्शनरांच्या दिवाळीवर आर्थिक टंचाईचे सावट राहणार आहे.

दिवाळीपूर्वी थकीत महागाई भत्ता द्या
मागणी : सेवानिवृत्त वेल्फेअर संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वर्धा : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अद्याप देण्यात आलेला नाही. यामुळे पेन्शनरांच्या दिवाळीवर आर्थिक टंचाईचे सावट राहणार आहे. यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी थकित महागाई भत्ता अदा करावा, अशी मागणी सेवानिवृत्त वेल्फेअर संघटनेने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे यांना शासनाने अधिकृत चर्चेला बोलविले असते तर पेन्शनरांचे प्रश्न मांडता आले असते; पण तसे झाले नाही. सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही शासनाने दिल्याचे सांगण्यात आले; पण पेन्शनरांचे प्रश्न सोडवावे, त्यासाठी पेन्शनर असो. च्या पदाधिकाऱ्यांना बोलवावे, अशी मागणीही करण्यात आली. आश्वासित केल्याप्रमाणे दिवाळीपुर्वी महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याबाबत १३ आॅक्टोबरच्या मंत्रीमंडळ बैठकीतून निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा होती. शिवाय वेतन सुधार समिती निर्माण करण्यात येईल, अशी अपेक्षा होती; पण या दोन्ही बाबी दुर्लक्षित करण्यात आल्याचे निदर्शनास येते.
दिवाळी २९ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. यामुळे दिवाळीची पेन्शन २५ आॅक्टोबरला देण्याची ग्वाही कोषागार अधिकाऱ्यांनी दिली. थकित महागाई भत्ता व वेतन सुधार समितीचा आदेश १८ आॅक्टोबरच्या मंत्रीमंडळ बैठकीत वा तत्पूर्वी काढावा, तरच पेन्शनरांची दिवाळी साजरी होऊ शकेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने यावर त्वरित निर्णय घेत सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही संघटनेचे अध्यक्ष अरविंद गवरशेट्टीवार व पदाधिकाऱ्यांनी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन देण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)