बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्या
By Admin | Updated: April 29, 2016 02:14 IST2016-04-29T02:14:37+5:302016-04-29T02:14:37+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते.

बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्या
जोगेंद्र कवाडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बसविल्या होत्या कोनशिला
पुलगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक बुद्ध विद्या विहाराची स्वत: कोनशिला ठेवली होती. या वास्तूचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्यात आले व ते पूर्णही झाले. राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार या बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा देऊन विकास करावा, अशी मागणी पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.
बुद्धविहार समितीद्वारे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या आगमन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या-त्या ठिकाणांचा बाबासाहेबांचे स्मारक म्हणून विकास करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार येथील बुद्ध विद्याविहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्यावा. पुलगाव नगरीत डॉ. आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ ला आगमन झाले व बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच या विहाराचे भूमिपूजन केले. त्यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून सुरू झाली. तेव्हापासून व्यवस्थापक मंडळ डॉ. बाबासाहेबांचा आगमन दिन म्हणून २५ एप्रिल या दिवसाचे स्मरण करतात. ते कौतुकास पात्र आहेत. या विहाराचा प्रश्न आपण शासन दरबारी नेटाने लावल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आ. कवाडे यांनी अनेक राष्ट्रीय मुद्यांना हात घातला.
अध्यक्षीय भाषणात अॅड. प्रेम भिमटे यांनी तरूण पिढीला डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण लिखान वाचून काढावे. युवकांनी त्यांच्या मार्गावर चालावे, असे आवाहन केले.
कार्यक्र्रमाचे प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी केले. अहवाल वाचन अध्यक्ष हरिष नितनवरे यांनी तर संचालन सचिव गोरखनाथ मेश्राम यांनी केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. गायक प्रवीण कांबळे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच बुद्धविहाराचे भूमिपूजन
पुलगाव नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वीच बाबासाहेबांनी येथील बुद्ध विद्या विहाराचे भूमिपूजन केले. यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचे मतही आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. यामुळे पुलगावच्या बुद्ध विद्या विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.