हेक्टरी २५ हजारांची मदत द्या
By Admin | Updated: October 24, 2015 02:08 IST2015-10-24T02:08:49+5:302015-10-24T02:08:49+5:30
सोयाबीन उत्पादन एकरी अर्धा ते एक पोते येत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

हेक्टरी २५ हजारांची मदत द्या
राजू तिमांडे यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी
हिंगणघाट : सोयाबीन उत्पादन एकरी अर्धा ते एक पोते येत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. कपाशी किडीने पछाडल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अशावेळी तातडीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना एकरी २५ हजार रुपयांप्रमाणे शासनाने मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवदेनातून केली आहे.
सोयाबीनचे उतारे यंदा कमालीचे कमी असून या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची रक्कमही उत्पादनातून निघाली नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणीच केली नाही. कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पीकही घेणे शक्य नाही. त्यातच सोयाबीनच्या हमीभावात नाममात्र वाढ करून शासनाने शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. सर्वत्र परिस्थिती गंभीर आहे. या हंगामात सोयाबीन तसेच कापसाचे व्यवस्थापनच बिघडले असून कपाशीला बोंड नाहीत मर रोगाचा प्रादुर्भावाने कपाशीचे उभे पीक वाळत आहे.
पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या हातातून सोयाबीन गेले आहे. त्यांना लागणारा खर्चही निघणे कठीण झाल्याचे चित्र आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत शासनाने करावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे. सोबतच त्यांनी कपाशीला सहा हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)