मुलींचीच सरशी
By Admin | Updated: May 26, 2016 01:00 IST2016-05-26T00:21:29+5:302016-05-26T01:00:58+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

मुलींचीच सरशी
जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के : १३ हजार ८७९ विद्यार्थी उत्तीर्ण
वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली. गतवर्षी ८८.८६ टक्के एवढा निकाल होता. सतत तिसऱ्या वर्षी ही घसरण कायम आहे. यंदाही जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली असून पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींची आघाडी कायम राहिली.
जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान यंदा वर्धा येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजच्या स्वराली विलास घोडखांदे या विद्यार्थिनीने पटकाविला. तिला ६५० पैकी ६२४ गुण (९६ टक्के) मिळाले. प्रियाली संजय गाठे ही जिल्ह्यातून दुसरी आली. ती वर्धा येथील गांधीग्राम विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६५० पैकी ६११ गुण (९४ टक्के) मिळाले. तृतीय स्थान कल्याणी ज्ञानेश्वर लोणकर हिने मिळविले असून ती वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात पहिली आली आहे. तीसुद्धा वर्धा येथील गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६५० पैकी ६१० गुण (९३.८५ टक्के) मिळाले.
नागपूर विभागाचा निकाल १ वाजता आॅनलाईन जाहीर होताच तो पाहण्यासाठी मुलांची धावपळ सुरू होती; पण स्मार्टफोनच्या जगात निकाल प्रत्येकाच्या हाती असल्याचे चित्र होते. ज्यांच्या स्मार्ट फोन नव्हते, ते सायबार कॅफेत गर्दी करताना दिसून आले.
जिल्ह्यातील एकूण १३४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण १६ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यापैकी १६ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १३ हजार ८७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ६४८ मुले तर ७ हजार २३१ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ७९.७२ टक्के तर मुलींची टक्केवारी ८७.३५ एवढी आहे.