अद्रकाच्या शेतीतून मिळविला १८ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST2021-02-26T05:00:00+5:302021-02-26T05:00:37+5:30
देवळी तालुक्याच्या टाकळी (चणाजी) या छोट्याशा खेड्यातील सूरज व धीरज केशव कांबळे या भावंडाची ही यशोगाथा आहे. या दोन्ही भावंडानी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पण, नोकरीत वेळ घालविण्यापेक्षा वडिलोपार्जित असलेल्या साडेआठ एकर शेतीत राबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन प्रयोगात्मक शेती करायला सुरुवात केली. इंटरनेटच्या माध्यमातून विविध पिकांची माहिती घेत गेल्यावर्षी तीन एकरामध्ये अद्रकाची लागवड केली.

अद्रकाच्या शेतीतून मिळविला १८ लाखांचा नफा
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतीत कपाशी, सोयाबीन, तुरी यासारखे पारंपरिक पीक घेतले जाते. गेल्या दोन वर्षात अस्मानी-सुलतानी संकटाने या पिकांचा मातेरा झाला. अशातच कोरोनाच्या प्रकोपात कवडीमोल भावात शेतमाल विकावा लागल्याने खर्चही निघाला नाही. अशाही परिस्थितीत पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत भावंडांनी तीन एकरात अद्रकाची शेती फुलविली. यातून पाच-दहा नाही तर तब्बल १८ लाखांचा निव्वळ नफा मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.
देवळी तालुक्याच्या टाकळी (चणाजी) या छोट्याशा खेड्यातील सूरज व धीरज केशव कांबळे या भावंडाची ही यशोगाथा आहे. या दोन्ही भावंडानी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पण, नोकरीत वेळ घालविण्यापेक्षा वडिलोपार्जित असलेल्या साडेआठ एकर शेतीत राबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन प्रयोगात्मक शेती करायला सुरुवात केली. इंटरनेटच्या माध्यमातून विविध पिकांची माहिती घेत गेल्यावर्षी तीन एकरामध्ये अद्रकाची लागवड केली.
अद्रकाचे पीक नऊ महिन्याचे असून त्याचे संगोपण व देखभाल सुरळीत केली असता तीन एकरात त्यांना ३०७ क्विंटल उत्पादन झाले. आठ ते साडेआठ हजार रुपये क्विंटलने त्यांना भाव मिळाल्याने त्यांना सरासरी २४ लाखाचे उत्पन्न झाले. यातून बेणं, ड्रिप, खत, मजुरी आदींकरिता लागलेला सहा लाखांचा खर्च वगळता तब्बल १८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. सूरज हा मार्केटिंग तर भाऊ धीरजसह वडील, आई आणि इतर सदस्य शेतातील जबाबदारी सांभाळतात. या दोन्ही भावंडाचा हा अभिनव प्रयोग इतरही युवा शेतकऱ्यांसाठी आता प्रेरणादायी ठरत आहे.
थेट शेतातूनच केली जातेय बेणे विक्री
अद्रकाच्या बेण्याला मोठी मागणी यायला लागली आहे. त्यामुळे यावर्षी पुन्हा सहा एकरामध्ये अद्रकाची लागवड केली आहे. कोरोनाकाळात ४०० क्विंटल बेण्याची मागणी होती. ती मागणी पूर्ण करण्यात वाहतुकीसंदर्भात अडचण निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून या दोन्ही भावंडांनी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत बोलावून बेण्याचा पुरवठा केला. यात दलाल, हमाल नसल्याने शेतकऱ्यांनाही थेट माल मिळाला. तसेच सर्व व्यवहार डिजिटल असल्याने नफ्यामध्येही भर पडली. परिणामी कोरोनायनातही नुकसान सहन करण्याची वेळ आली नाही, असे युवा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
आम्ही आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेत अंद्रकाची लागवड केली. भुसभुशीत जमिनीत होणारे अद्रकाचे पीक काळ्या जमिनीत घेण्याचे आव्हान उभे ठाकले होते. याकरिता आधुनिकपद्धतीने लागवड करुन पीकाचे संगोपण केले. या तीन एकरात खर्च वजा जाता १८ लाखांचा निव्वळ नफा मिळाल्याने आता तायवान पपईचा प्रयोग केला आहे. यातुनही दहा लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. पपईला दिल्लीमध्ये जास्त दर असल्याने तेथे नेण्याचे नियोजन आहे.
सूरज केशव कांबळे, युवा शेतकरी