आरक्षणाने बिघडली दिग्गजांची गणिते
By Admin | Updated: October 6, 2016 00:44 IST2016-10-06T00:44:41+5:302016-10-06T00:44:41+5:30
जि.प. व पं.स. आरक्षण सोडतीने देवळी तालुक्यातील अनेक दिग्गजांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

आरक्षणाने बिघडली दिग्गजांची गणिते
पंचायत समिती आरक्षणाची सोडत
देवळी : जि.प. व पं.स. आरक्षण सोडतीने देवळी तालुक्यातील अनेक दिग्गजांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. काहींच्या आशा पल्लवित झाल्याने नवीन समिकरणे समोर येणार आहेत.
अंदोरी जि.प. गट हा सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने विद्यमान जि.प. सदस्य व जि.प.चे माजी उपाध्यक्ष संजय कामनापुरे यांच्यासाठी हा गट पुन्हा आशादायक ठरल्याचे बोलले जात आहे. गौळ जि.प. गटाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व करणारे विद्यमान सदस्य आणि माजी शिक्षण सभापती मोरेश्वर खोडके यांची यावेळेस आरक्षणाने विकेट घेतली आहे. हा मतदार संघ अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षित झाला आहे. नाचणगाव जि.प. मतदार संघ हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या जि.प. गटाचे माजी जि.प. सदस्य दिलीप यांची मागील १० वर्षापासूनची अधिसत्ता संपुष्टात आली. या जि.प. गटात दिलीप अग्रवाल यांनी एक टर्म तर त्यांच्या मातोश्री व विद्यमान जि.प. सभापती शामलता अग्रवाल यांनी एक टर्म अशा पद्धतीने अपक्ष निवडणूक लढवून सर्वांचे लक्ष वेधले होते. गुंजखेडा जि.प. गट हा सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्याने येथील विद्यमान जि.प. सदस्य मोहन शिदोडकर यांची व्यक्तीगत कोंडी झाली आहे. महिला आरक्षण असल्याने याठिकाणी शिदोडकर यांच्या दावेदारीसोबत काहींच्या आशा पल्लवित झाल्याने नवीन समिकरणे चर्चेत आहेत.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या भिडी जि.प. गटात अनेकांची दावेदारी सांगितली जात आहे. हा गट सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्याने अनेक राजकीय पहेलवान या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या ठिकाणी विद्यमान जि.प. सदस्य म्हणून काँग्रेसच्या उज्वला सुरेश राऊत या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे देवळी पंचायत समिती सभापती भगवान भरणे यांचा बोरगाव आलोडा मतदार गण हा अनुसूचित जमाती महिलासाठी तसेच उपसभापती गुलाब डफरे यांचा नांदोरा मतदार गण हा सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्याने या दोन्ही पदाधिकाऱ्यांची गच्छंती होईल.(प्रतिनिधी)
अनेकांचा हिरमोड
आर्वी - पं.स. च्या सभागृहात तालुक्यातील बारा गणांची नव्याने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी पं.स. सरिता पवार, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, विद्यमान पं.स. उपसभापती व सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. यात तालुक्यातील बहुतांश गणांचे आरक्षण हे महिलांकरिता राखीव निघाल्याने विद्यमान उपसभापती बाळा नांदूरकर, पं.स. सदस्य वैभव जगताप, प्रकाश खोंडे, प्रमोद डोळे, देविदास शिरपूरकर यांना नवीन आरक्षणाचा फटका बसला आहे. बाराही गणांची सोडत ऐकण्यासाठी तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक सदस्यांची उपस्थिती होती. या पं.स. निवडणुकीत इच्छुक अनेक उमेदवारांचा नवीन आरक्षणाने हिरमोड झाला आहे. या नव्या आरक्षणाने विद्यमान सदस्यांना महिलानांच निवडणुकीत समोर करावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विद्यमान उपसभापतीसह इतर सदस्यांना याचा फटका बसला आहे. यात अनेक दिग्गजांचे गणित बिघडल्याचे चित्र आहे.(तालुका प्रतिनिधी)