‘टीईटी’चे भूत पुन्हा मानगुटीवर
By Admin | Updated: November 15, 2014 22:51 IST2014-11-15T22:51:53+5:302014-11-15T22:51:53+5:30
मागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून शासनाने कोट्यवधीची कमाई केली़ आता पुन्हा टीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे़ यामुळे डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगारांना भुर्दंड

‘टीईटी’चे भूत पुन्हा मानगुटीवर
प्रभाकर गायकवाड ल्ल पिंपळखुटा
मागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून शासनाने कोट्यवधीची कमाई केली़ आता पुन्हा टीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे़ यामुळे डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगारांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे़ डीएड, बीएड झाल्यानंतरही पात्रता सिद्ध करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ही परीक्षा म्हणजे बेरोजगारांना लुटण्याचा घाट असल्याच्या प्रतिक्रीया आता बेरोजगारांतून उमटत आहेत़
मागील वर्षी केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांनाच उत्तीर्ण करता आलेली टीईटी परीक्षा अनेक घोळांमुळे गाजली होती़ या परीक्षेच्या माध्यमातून मागील वर्षी शासनाने ३० कोटी रुपयांचा भुर्दंड बेरोजगार भावी शिक्षकांवर लादला होता़ यंदाही मागील वर्षीप्रमाणे डिसेंबर २०१४ मध्ये पुन्हा टीईटी परीक्षेचा घाट शासनाने घातला आहे़ शिक्षण अधिकार कायद्यानुसार ५-३-२ चा फॉर्म्यूला अंमलात आणला असून पहिल्या स्तरात इयत्ता बारावी डीएड तर दुसऱ्या स्तरात पदवीधर शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य आहे़ शासनाने यासाठी प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य केली आहे़
एका स्तरासाठी परीक्षा शुल्क ५०० रुपये तर दोन्ही परीक्षांसाठी ८०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे़ मागील परीक्षेतही असेच शुल्क आकारण्यात आले होते़ त्यावेळी लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़ या परीक्षेत अनेक त्रुट्या राहिल्याने केवळ पाच टक्केच निकाल लागला होता़ शासनाची मात्र कोट्यवधीची कमाई झाली़ टीईटी पास होणे म्हणजे नोकरी नव्हे ती केवळ प्रमाणपत्र मिळविण्याची परीक्षा आहे़ गतवेळी उत्तीर्ण झालेले हजारो बेरोजगार आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत़ दरम्यान, शिक्षण अधिकार कायद्यानुसार नव्याने करण्यात आलेल्या संच मान्यतेत हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ या शिक्षकांचे समायोजन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे़ समायोजन प्रक्रिया पूर्ण होऊनही शिक्षक अतिरिक्त राहण्याची शक्यता आहे़ अशी अवस्था असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे़ १४ डिसेंबर २०१४ रोजी ही परीक्षा होत आहे़ यंदाही पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारण्यात आले आहे़ नोकरीची कुठलीही हमी नसताना परीक्षा पास झाल्यानंतर केवळ प्रमाणपत्र हातात घेऊन फिरणाऱ्या तरूणांकडून परीक्षा शुल्कापोटी कोट्यवधींची कमाई करण्याचा घाट शासनाने घातला असल्याचा संताप बेरोजगारांकडून व्यक्त होत आहे़