पिपरी पुनर्वसनवासीय महिलांचा निम्न वर्धा कार्यालयांवर घागर मोर्चा
By Admin | Updated: April 30, 2016 02:19 IST2016-04-30T02:19:35+5:302016-04-30T02:19:35+5:30
गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे.

पिपरी पुनर्वसनवासीय महिलांचा निम्न वर्धा कार्यालयांवर घागर मोर्चा
अधिकाऱ्यांना घेराव : सहाऐवजी आता तीनदाच येतात टँकर
वर्धा : गावात पाण्याच्या थेंबाकरिता नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली असताना निम्न वर्धा विभागाकडून सहा वेळा पाठविण्यात येत असलेले पाण्याचे टँकर तीनच वेळा पाठविण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या पिपरी पुनर्वसन येथील महिलांनी शुक्रवारी निम्न वर्धा विभागाच्या कार्यालयावर घागर मोर्चा नेला. यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालत गावात पाणी पुरविण्याची मागणी केली. तर अधिकाऱ्यांनी यावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी माघार घेतली.
निम्न वर्धा धरणात जमिनी गेलेल्या काही गावांचे पुनर्वसन सालोड (हिरापूर) नजीकच्या पिपरी येथे करण्यात आले. येथेही सुविधा पुरविण्याकरिता प्रशासनाच्यावतीने दिरंगाई करण्यात आली. गावात पाण्यासह इतर सुविधांची वाणवा आहे तर भर उन्हाळ्यात येथे पाण्याकरिताही नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठला आहे.
शिवाय पाणी पुरवठ्याच्या नळयोजनेची पाईपलाईन नादुरूस्त आहे. अशात गावात पाणी पुरविण्याकरिता दिवसात तीनच टँकर पाठविण्यात येत आहे. येथे पाण्याकरिता महिलांची भांडणे होत असल्याने टँकरचे पाणी विहिरीत टाकण्यात येत आहे. येथेही महिलांची भांडणे होत आहेतच. गावात पूर्वी प्रमाणे सहावेळा पाण्याचा टँकर पाठवा, अशी मागणी करीत येथील महिलांनी निम्न वर्धा कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला.
यावर अधिकाऱ्यांनी गावातील पाणी समस्या निकाली काढण्याकरिता एक नवीन विहीर प्रस्तावित असून त्यावर निर्णय होणे बाकी आहे. तर नादुरूस्त असलेली पाईपलाईन दुरूस्त करण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. यावर लवकरच काम सुरू होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांना महिलांना सांगितले. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)