थकीत वेतन देत कामावर घ्या
By Admin | Updated: January 5, 2016 02:38 IST2016-01-05T02:38:40+5:302016-01-05T02:38:40+5:30
लॅन्को विदर्भ थर्मल पॉवर प्लांट मांडवा येथील चार कामगार टीपीएस बिल्डर लिमिटेड या कंत्राटदाराच्या माध्यमातून ईएसपी १

थकीत वेतन देत कामावर घ्या
लॅन्कोतील कामगारांची आर्त हाक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
वर्धा : लॅन्को विदर्भ थर्मल पॉवर प्लांट मांडवा येथील चार कामगार टीपीएस बिल्डर लिमिटेड या कंत्राटदाराच्या माध्यमातून ईएसपी १ या कंपनीच्या साईटवर कार्यरत होते. सदर कामगारांना नोव्हेंबर २०१२ ते कंपनीचे काम बंद होईपर्यंतचे वेतन देण्यात आलेले नाही. यामुळे थकीत वेतन देत पूर्ववत कामावर घेण्यात यावी, अशी मागणी चारही कामगारांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे घातले आहे.
सुनेंद्र बळीराम भिमटे, आकाश रामदास निकम, प्रवीण बापूराव डुबे आणि राजू झोटींग हे लॅन्को थर्मल पॉवर प्लांटमध्ये नोव्हेंबर २०१२ पासून कार्यरत होते. त्यांनी कंपनीचे काम बंद होईपर्यंत सेवा दिली; पण अद्याप त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. मार्च ते आॅक्टोबर २०१२ पर्यतचा पी.एफ. कपात करूनही त्यांना देण्यात आला नाही. लॅन्को कंपनी गत सहा महिन्यांपासून पूर्ववत सुरू आहे. यामुळे वेतन मिळण्याची अपेक्षा होती; पण अद्याप वेतनही दिले नाही आणि कामावरही घेण्यात आले नाही. सदर कंपनीमध्ये काही जुन्या व नवीन कामगारांची भरती करण्यात आली आहे. भिमटे, निकम, डुबे व झोटींग यांनी कामावर घेण्यात यावे म्हणून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत निवेदने दिली; पण त्याचा उपयोग झाला नाही. सहा महिन्यांपासून पाठपुरावा करूनही रोजगार दिला नाही. यामुळे ते आर्थिक विवंचनेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सदर कामगारांनी निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
कामगारांची उपासमार
४नोव्हेंबर २०१२ पासून वेतन देण्यात आलेले नसल्याने ते आर्थिक विवंचनेत आहे. सध्या लॅन्को कंपनी सुरू झाल्याने कामागारांना पूर्ववत कामावर घेणे गरजेचे होते; पण टाळाटाळ केली जात आहे. यामुळे सुनेंद्र भिमटे, आकाश निकम, प्रवीण डुबे व राजू झोटिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.