सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्या कुटुंबीयांना मदत मिळावी
By Admin | Updated: November 28, 2015 03:04 IST2015-11-28T03:04:24+5:302015-11-28T03:04:24+5:30
वाघ व तत्सम प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना शासनाच्यावतीने मदत मिळते.

सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्या कुटुंबीयांना मदत मिळावी
वर्धा : वाघ व तत्सम प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना शासनाच्यावतीने मदत मिळते. त्याच प्रमाणे सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांच्या अप्तांना शासनाची मदत मिळावी, अशी मागणी विदर्भ सर्प मित्र मंडळाचे संस्थापक सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांच्यासह सदस्यांनी खा. रामदास तडस यांना निवेदनातून केली. शिवाय या विषयावर चर्चाही करण्यात आली.
संपूर्ण भारतात विविध राज्यात एक वन्य जीव असलेल्या व इतर वन्यजीवाप्रमाणे वन्यजीव संरक्षण सूचित अनुसूची १ व अनुसूची २ मध्ये असलेल्या विषारी साप या वन्य जीवाच्या दंशाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक शेतकरी, शेतमजूर, रस्त्याच्या, बांध वस्तीच्या, जंगलतोड करणारे मजूर वन विभागात रोजंदारी करणाऱ्या मजुरांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या वारसांना किंवा कुटुंबांना वनखाते विभागाकडून, सरकारकडून, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री सहायता कोषमधून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. वन्यजीव संरक्षण सूचित अनुसूची एक व अनुसूची २ मध्ये असलेल्या अस्वल, वाघ, सिंह, बिबट, हत्ती व तत्सम प्राण्याच्या हल्ल्यात जायबंदी वा मृत्यू झाल्यास ताबडतोब आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रात तर आठ लाख रुपये दिले जाते. परंतु विषारी सर्पदंशाने मृत्यू झाल्यास आर्थिक मदत दिली जात नाही. माणूस जंगलात शिरतो किंवा जंगलाशेजारी राहतो. त्या परिस्थितीत वन्यप्राणी हल्ला करतात. विषारी साप शेतात कामाच्या जागी, घरात दंश करतात. साप व इतर प्राणी एकाच अनुसूचीमध्ये असूनसुध्दा हा भेदभाव केला जातो. त्याबद्दल केंद्र शासनाने पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा तसेच राज्य सरकारला निर्देश द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरात हा प्रश्न लावून धरून वनमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन खा. तडस यांनी दिले. यावेळी मंगेश शेंडे, मयूर राऊत, नरेंद्र कांबळे, सुनील ढाले, प्रकाश कांबळे उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दादाराव केचे उपस्थित होते.(प्रतिनिधी)