‘त्या’ समाज कंटकाला अटक करा
By Admin | Updated: May 27, 2016 01:59 IST2016-05-27T01:59:52+5:302016-05-27T01:59:52+5:30
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तसेच म. फुले वॉर्डातील बुद्ध विहारावर पेंट फेकून विटबंना ...

‘त्या’ समाज कंटकाला अटक करा
ठाणेदाराला मागणी : परिसरात तणावाचे वातावरण
हिंगणघाट : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तसेच म. फुले वॉर्डातील बुद्ध विहारावर पेंट फेकून विटबंना केल्याच्या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शहरातील व्यवसायिकांनी या घटनेच्या निषेधार्थ आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. ही घटना गुरूवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
डॉ. आंबेडकर चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्यावर अज्ञात इसमाने पेंट फेकून विद्रुप केल्याची घटना नागरिकांच्या लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित डॉ. पी.जी. खोब्रागडे, अॅड. ऋषी सुटे, बबिता वाघमारे, रसपाल शेंदरे, टी.एफ. शेंडे, प्रलय तेलंग, बुद्धम कांबळे, प्रभाकर कांबळे, लता थूल, सुनील डोंगरे, सुरेखा मेश्राम, विजय तामगाडगे, शंकर मुंजेवार, अनिल मुन, सुमेध पाटील, विक्की वाघमारे, सुरेश मुंजेवार, भीमराव वाघमारे, राजकुमार मेश्राम, मयुर सुखदेवे, मनोज रूपारेल, बाळा मानकर, राजू फुलझेले, चक्षुपाल शिंपी, भीमराव वाघमारे, संजय वानखेडे आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील या पुतळ्या जवळ सि.सी. टिव्ही कॅमेरे व २४ तास दोन चौकीदार कायम स्वरूपी नेमण्याची व आरोपीला तात्काळ शोध घेण्याची मागणी एका निवेदनाद्वारे ठाणेदारांना केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पेंट मिसळण्यासाठी वापरलेली काडी तसेच पेंटचे डब्बे जप्त केले असून याठिकाणी ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते.
तत्पूर्वी नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी, ठाणेदार निलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर, तहसीलदार दीपक कारंडे, न.पा. मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल मुन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंविच्या कलम २९५ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)