मृत्यूस जबाबदार इसमाला अटक करा
By Admin | Updated: December 14, 2015 02:02 IST2015-12-14T02:02:54+5:302015-12-14T02:02:54+5:30
देवळी तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकरी कवडू महेशगौरी यांचा २ नोव्हेंबर रोजी वीज प्रवाहित शेताच्या कुंपणाचा धक्का लागल्याने मृत्यू झाला.

मृत्यूस जबाबदार इसमाला अटक करा
विजेच्या धक्क्याने मृत्यू प्रकरण : पोलीस अधीक्षकांना निवेदनातून साकडे
वर्धा : देवळी तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकरी कवडू महेशगौरी यांचा २ नोव्हेंबर रोजी वीज प्रवाहित शेताच्या कुंपणाचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणात तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही. पोलीस अधीक्षकांनी चौकशी करीत रामदास शिवरकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मृतकाचा मुलगा कुणाल याने निवेदनातून केली आहे.
चिंचाळा येथील महेशगौरी व शिवरकर यांचे शेत लागून आहे. २ नोव्हेंबर रोजी कवडू महेशगौरी हे सकाळी शेतात ओलितासाठी गेले होते. धुऱ्यावर शौचास गेले असता कवडू यांना तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवरकर यांनी शेताला तारेचे कुंपण करून वीज प्रवाहित केली होती. याबाबत देवळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला; पण शिवरकर यास अटक केली नाही. आई-वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने कुणाल व कुटुंब निराधार झाले आहे. यातील शिवरकर हे धमकावणी करीत असल्याचेही कुणाल याने निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी अधीक्षकांना निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)