संतप्त शेतकऱ्यांचा कनिष्ठ वीज अभियंत्याला घेराव
By Admin | Updated: November 6, 2014 02:06 IST2014-11-06T02:06:13+5:302014-11-06T02:06:13+5:30
अनियमित भारनियमन आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़ बुधवारी अखेर शेतकऱ्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्याने ...

संतप्त शेतकऱ्यांचा कनिष्ठ वीज अभियंत्याला घेराव
बोथूडा : अनियमित भारनियमन आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़ बुधवारी अखेर शेतकऱ्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्याने व मांडगाव येथील वीज वितरण कार्यालयात कनिष्ट अभियंत्यास घेराव करण्यात आला़ भारनियमन नियंत्रीत करून ‘हायव्होल्टेज’ वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी करीत सुमारे एक ते दीड तास घेराव घातला़ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा राग शांत झाला़
भारनियमनाचे वेळापत्रक तयार करावे, सायंकाळी भारनियमन करून हायव्होल्टेज वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी (दि़५) दुपारी मांडगाव, बोथुडा, मनगाव, सुजातपूर, चिंचोली येथील कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी कनिष्ट अभियंत्यास जाब विचारला़ यापूर्वी तक्रारी व निवेदने देऊनही भारनियमन अनियमित होत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते़ यंदा पाऊस विलंबाने व अपूरा आल्याने पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे़ यातच वेळी-अवेळी भारनियमन केले जात असल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले़ शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली़ यामुळे कनिष्ट अभियंता कुंभारे यांनी याबाबत हिंगणघाट उपविभागीय अभियंता शिरसे यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ते मांडगाव कार्यालयात दाखल झाले. शेतकऱ्यांच्या मागणीवर त्वरित निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिली़
यावेळी झालेल्या चर्चेत शिरसे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला़ अनियमित भारनियमन, कमी दाबाचा वीज पुरवठा या प्रमुख समस्यांसह लाईनमन वेळेत कर्तव्यावर येत नसल्याने तांत्रिक बिघाड दुरूस्त होत नसल्याचे सांगितले़ खासगी लाईनमनचा आधार घेत खंडित वीज पुरवठा पूर्ववत करावा लागतो, असे सांगितले़ यावरही चर्चा करण्यात आली़ आंदोलकांत सुरेश डांगरी, ईश्वर इंगोले, पाहुणे, हेमंत तवने, बंडू दांडेकर, नारायण पाहुणे, गजानन खोंडेकर, महेश बोरकर आदी शेतकऱ्यांचा समावेश होता़(वार्ताहर)