ताडपत्री वितरणाने गाजली पंचायत समितीची मासिक सभा

By Admin | Updated: June 20, 2014 00:01 IST2014-06-20T00:01:33+5:302014-06-20T00:01:33+5:30

स्थानिक पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या ५० टक्के अनुदानावरील ताडपत्री वितरणात दुजाभाव होत असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या पं़स़ सदस्यांनी घेतला़ नुकतीच पार पडलेली पं़स़ ची मासिक सभाही

Gazli Panchayat Samiti's monthly meeting | ताडपत्री वितरणाने गाजली पंचायत समितीची मासिक सभा

ताडपत्री वितरणाने गाजली पंचायत समितीची मासिक सभा

काँगे्रस सदस्यांचा आक्षेप : २२० ताडपत्र्यांचे वितरण रखडले
कारंजा (घा़) : स्थानिक पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या ५० टक्के अनुदानावरील ताडपत्री वितरणात दुजाभाव होत असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या पं़स़ सदस्यांनी घेतला़ नुकतीच पार पडलेली पं़स़ ची मासिक सभाही याच मुद्यावर गाजली़
पं़ स़ कडे उपलब्ध ताडपत्र्यांचे वाटप सत्तारुढ सदस्यांच्या मर्जीने झाले. सर्कलनुसार सम प्रमाणात वाटप होत नसल्याची लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे काँग्रेसचे पं.स. सदस्य तेजराव बन्नगरे, किशोर उंकडे, संगीता खोडे, ज्योती भूतडा यांनी यापूर्वी केली होती. यावरून वाटप तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. कारंजा पं.स. सदस्यांची मासिक सभा नुकतीच पार पडली़ या सभेत अन्य विषयांसह ताडपत्री वाटपाचा मुद्दा तक्रारकर्त्या काँग्रेसच्या पं.स. सदस्यांनी उचलून धरला. ताडपत्रीचे वाटप करताना सर्व सदस्यांना समान वाटा मिळावा, सर्व सर्कलला प्रतिनिधीत्व देण्यात यावे यावर चर्चा झाली. शेवटी सभापतींनी या मुद्दावर चर्चा करून प्रत्येक सदस्याने २० जूनपर्यंत संबंधित शेतकऱ्यांकडून मागणी पत्र पंचायत समितीला कागदपत्रासह सादर करावे, केवळ यादी देऊन चालणार नाही, असा तोडगा काढला व विरोधकांना शांत केले. १२ फेब्रुवारीच्या मासिक सभेतील मंजुरीप्रमाणे कृषी विभागामार्फत शेष फंडातून २०१३-१४ करीता ६ लाख ३६ हजार रुपयांच्या ५४० ताडपत्र्या खरेदी करून ५० टक्के अनुदानावर गरजू शेतकऱ्यांना वाटप करण्याचे ठरले होते. लाभार्थ्यांना ६७६ मीटरची एक ताडपत्री ५० टक्के अनुदानावर १२०० रुपयांत मिळणार आहे़ आतापर्यंत २२० शेतकऱ्यांना योग्य कागदपत्रे दिल्यानंतर ताडपत्रींचे वाटप करण्यात आले़ उर्वरित ताडपत्र्या मासिक सभेत ठरलेल्या धोरणानुसार वितरित होणार असल्याचे कृषी अधिकारी आदेवार यांनी सांगितले.
कारंजा पंचायत समितीमध्ये भाजपचे ५, काँग्रेसचे ४, राष्ट्रवादीचा १ असे १० सदस्य आहेत. प्रत्येक पं़स़ सदस्याच्या वाट्याला त्याच्या क्षेत्रात वाटण्यासाठी किमान ५० ताडपत्र्यांचा कोटा देण्यात यावा, असे आग्रही मत सदस्य तेजराव बन्नगरे यांनी मांडले. यानंतर पं.स. मार्फत वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याचे समान वाटप केले जाईल, अशी अपेक्षा काँग्रेस सदस्य व्यक्त करताहेत़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gazli Panchayat Samiti's monthly meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.