सोयाबीनऐवजी शेतात फोफावलेय गाजरगवत
By Admin | Updated: October 21, 2014 22:57 IST2014-10-21T22:57:17+5:302014-10-21T22:57:17+5:30
यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली.

सोयाबीनऐवजी शेतात फोफावलेय गाजरगवत
वर्धा : यंदा सुरुवातीला उशिरा आलेला आणि त्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनची लागवड करायला विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अखेरपर्यंत पावसाने साथ न दिल्यामुळे शेतात बेसुमार गाजरगवत वाढले असून, पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी, पीक सवंगणेही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे ठरत आहे.
पवनार येथील शेतकरी गंगाधर पाहुणे यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी आपल्या पाच एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. यानंतर त्यांनी सोयाबीनच्या पिकावर दोन वेळा तणनाशकाची फवारणी केली; पण पिकांची वाढ न होता गाजरगवतच वाढत गेले. पावसाने दगा दिल्याने पिकांची वाढ खुंटली. सोयाबीनच्या झाडांची वाढच झाली नाही. त्यांना या पाच एकर शेतात लागवडीकरिता जवळपास ५० हजार रुपयांचा खर्च आला. सध्या पीक सवंगणीला आले असताना एकरी एक पोते सोयाबीनचा उतारा मिळेल, अशी शक्यता आहे.
सोयाबीनच्या एक एकरातील सवंगणीकरिता सुमारे दीड हजार रुपयांची मजुरी द्यावी लागणार आहे़ मशीनद्वारे सोयाबीन काढण्याकरिता एकरामागे ३०० रुपये खर्च आहे़ हे सोयाबीन बाजारात नेण्याकरिताही वेगळ खर्च करावा लागणार आहे़ शिवाय तन काढण्याचा खर्चही करावा लागत आहे़ सध्या सोयाबीनला असलेला भाव पाहता हा खर्च न परवडणारा आहे़ यामुळभे शेतकरी शेतात गुरे चारत आहेत़ परिसरातील शेतकरी सुभाष भट, योगेश डगवार, रामेश्वर येरुणकर, गोविंद पाटील, गणपत हिंगे, अनिल आंबटकर, महादेव सहारे, श्रीधर भुजाडे, वसंत पाहुणे, सतीश अवचट अशा अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यांच्यावरही सोयाबीनची सवंगणी न करता गुरांना चराईकरिता शेत उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे.
शासनाने या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)