सावली गावात गॅस्ट्रोची लागण, रुग्णसंख्येत वाढ
By Admin | Updated: July 10, 2015 00:20 IST2015-07-10T00:20:18+5:302015-07-10T00:20:18+5:30
हिंगणघाट तालुक्यातील सावली (सास्ताबाद) येथील ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.

सावली गावात गॅस्ट्रोची लागण, रुग्णसंख्येत वाढ
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील सावली (सास्ताबाद) येथील ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस्ट्रोच्या साथरोगामुळे रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असल्याचे दिसते. काही रुग्ण शासकीय तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
हंगामाच्या दिवसांत सावली येथे गॅस्ट्रोच्या आजाराचा फैलाव होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. शेतीला पैसे लावण्याचे दिवस असताना औषधोपचारावर खर्च करावा लागत असल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. या आजारामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा येथील वैद्यकीय अधिकारी सोनल चामटकर या गावाजवळून जातात; पण रुग्णांची पाहणी करीत नसल्याचा आरोप होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीमुळे या आजाराची लागण झाली आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी वर्षभर साफ केली जात नाही. नाल्यांची सफाई केली जात नाही. पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापरही केला जात नाही. अस्वच्छतेमुळेच गावात गॅस्ट्रोची लागण झाली आहे. याची कल्पना असताना सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिव व कर्मचारी दुर्लक्ष करतात. जिल्हा आरोग्य यंत्रणेने आजारावर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या व जि.प. प्रशासनाने निष्काळजी ग्रा.पं. प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)