पेट्रोलपंपावरून गॅस सिलिंडरची विक्री
By Admin | Updated: November 17, 2015 03:53 IST2015-11-17T03:53:47+5:302015-11-17T03:53:47+5:30
सिलिंडर हवे, मग या कारंजाच्या पेट्रोल पंपावर. येथे नोंदणी वा जोडणीची गरज नाही. सिलिंडर भरला ट्रक पेट्रोल पंपावर येताच

पेट्रोलपंपावरून गॅस सिलिंडरची विक्री
रूपेश मस्के ल्ल कारंजा (घाडगे)
सिलिंडर हवे, मग या कारंजाच्या पेट्रोल पंपावर. येथे नोंदणी वा जोडणीची गरज नाही. सिलिंडर भरला ट्रक पेट्रोल पंपावर येताच दलालाच्या माध्यमातून चालकाला काही रक्कम दिल्यास थेट भरलेले सिलिंडर ग्राहकाला मिळत असल्याचे वास्तव आहे. उघड्यावर सुरू असलेला हा व्यवसाय पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. मात्र त्याची तक्रार करण्यास कोणी धजावत नाही.
या पंपावर केवळ सिलिंडरचाच काळाबाजार होत नाही तर येथे रॉकेल मिश्रित पेट्रोलही विकल्या जात असल्याची ओरड शहरात आहे. हा प्रकार करताना पंपमालकाला पेट्रोल व रॉकेलची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची मदत मिळत असल्याचा आरोप आहे. याकडे शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
कारंजा तालुक्यात विविध कंपनीच्या सिलिंडरचे अधिकृत विक्रेते आहेत. त्यांच्याकडून ग्राहकांना नव्या नियमानुसार आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर सिलिंडर उपलब्ध करून दिल्या जाते. शासनाच्या नव्या नियमानुसार अवैध जोडण्या रद्द करण्यात येत आहे. शिवाय यावर सिलिंडर उचलल्यास मिळणाऱ्या अनुदानापासून ग्राहकाला मुकावे लागते. यामुळे येथील एका पेट्रोल पंप मालकाने सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाशी संधान जोडून अशा अवैध जोडणी असलेल्यांना सिलिंडर देण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. येथील पेट्रोल पंपावर सिलिंडरचा ट्रक येताच त्यातून मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असल्याचे दिसते. याकडे संबंधित विभागाचे लक्ष नसून यावर कारवाई करणे गरजेचे आहे. केवळ सिलिंडरचाच नाही तर येथे एक लिटर पेट्रोलच्या रकमेत ८०० मिली पेट्रोल नागरिकांना दिल्या जात असल्याची ओरड आहे.
लिकेजच्या नावाने
रिकामे सिलिंडर परत
४या सर्व हेराफेरीत ट्रकचालकाकडे गोळा होत असलेले सिलिंडर लिकेजच्या नावे कंपनीला परत पाठविले जात असल्याची माहिती आहे. यात ट्रक चालकाची चांगलीच कमाई होत असल्याचे दिसते. याकडे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
या प्रकारावर लक्ष ठेवण्याकरिता तहसील कार्यालयाची एक चमू आहे. त्यांच्यामार्फत याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- मिलिंद जोशी, तहसीलदार (प्रभारी), कारंजा (घाडगे)