सणाच्या दिवसात देवळीत गॅस सिलिंडरचा तुटवडा; नागरिक त्रस्त
By Admin | Updated: October 18, 2014 23:42 IST2014-10-18T23:42:19+5:302014-10-18T23:42:19+5:30
येथील आर. इंडियन गॅस कंपनीच्या ग्राहकांनी गत आठ ते १० दिवसांआधी सिलिंडरचे पैसे भरून सुद्धा गॅसचे सिलिंडर मिळत नसल्यामुळे गावात गोंधळ माजला आहे. गॅस सिलिंडरच्या गाड्यांचे बील

सणाच्या दिवसात देवळीत गॅस सिलिंडरचा तुटवडा; नागरिक त्रस्त
देवळी : येथील आर. इंडियन गॅस कंपनीच्या ग्राहकांनी गत आठ ते १० दिवसांआधी सिलिंडरचे पैसे भरून सुद्धा गॅसचे सिलिंडर मिळत नसल्यामुळे गावात गोंधळ माजला आहे. गॅस सिलिंडरच्या गाड्यांचे बील फाडून सुद्धा वेळेवर मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे हा तुटवडा निर्माण होवून, ग्राहकांना गॅस सिलिंडर देणे शक्य होत नसल्याचे एजन्सीच्यावतीने सांगण्यात येत आहे.
यामुळे सणांच्या दिवसात ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा तुटवडा एजन्सीच्या चुकीमुळे ही जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे याचा शोध जिल्हाधिकारी यांनी घेवून ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
याठिकाणी आर. इंण्डेन नावाची एकच गॅस एजन्सी कार्यरत असून त्यांच्याकडे शहरी व ग्रामीण भागातील सात हजार ५०० गॅस जोडण्या आहेत. तसेच सर्व ग्राहकांना सेवा देणे कंपनीच्या आवाक्याबाहेर ठरत असल्यामुळे हा गोंधळ माजल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देवळी शहरासाठी या गॅस एजन्सीच्या व्यतिरिक्त दुसरी एजन्सी देण्यात यावी. त्याचप्रमाणे आंजी (अंदोरी) येथील नवनिर्मात इंण्डेन गॅस एजन्सीला कार्यरत करून ग्रामीण भागातील गॅस सिलिंडरचा भार कमी करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
या एजन्सीवर सिलिंडरचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना तसेच लहान उद्योजकांना या एजन्सीच्यावतीने जास्तीच्या दरात सिलिंडरचा पुरवठा करून नियमीत ग्राहकांना डावलल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.
या आधी २१ दिवसानंतर सिलिंडर मिळत असल्यामुळे ग्राहकांची गर्दी होत नव्हती; परंतु आता वर्षभरात केव्हाही सिलिंडर नेण्याची मुभा असल्यामुळे गर्दी वाढत आहे. कधी-कधी सुट्या असल्यामुळे तसेच बँकेची लींक फेल राहत असल्यामुळे गाड्यांचे बील फाडण्यात उशीर होत असल्याचेएजन्सीच्या वतीने सांगण्यात येत आहे.(प्रतिनिधी)