गॅस सिलिंडरचा स्फोट; घराची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 22:09 IST2019-02-26T22:08:28+5:302019-02-26T22:09:01+5:30
अचानक लागलेल्या आगीने घरातील साहित्याला आपल्या कवेत घेतले. दरम्यान घरातील गॅस सिलिंडर फुटले. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी घरातील संपूर्ण साहित्य व घर जळून कोळसा झाले. यात कलावती हेमराज रेवतकर यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले असून या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

गॅस सिलिंडरचा स्फोट; घराची राखरांगोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
आंजी (मोठी) : अचानक लागलेल्या आगीने घरातील साहित्याला आपल्या कवेत घेतले. दरम्यान घरातील गॅस सिलिंडर फुटले. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी घरातील संपूर्ण साहित्य व घर जळून कोळसा झाले. यात कलावती हेमराज रेवतकर यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले असून या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक वॉर्ड २ मधील रहिवासी कलावती रेवतकर यांच्या घरातून जोरदार आवाज झाल्याने व घरातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काहींनी आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. आग लागल्याने निदर्शना येताच रेवतकर यांच्या शेजारी असलेल्या नागरिकांनी घराच्या आवारात असलेल्या विहिरीवरील पाण्याची मोटर सुरू करून आगीवर पाण्याचा मारा केला.
सुमारे दोन तासाच्या प्रयत्नाअंती ग्रामस्थांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती मिळताच खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर, मनिष मसराम, राजेश शेंडे, गजानन गायकी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
कलावती शिजविते विद्यार्थ्यांसाठी खिचडी
कलावती रेवतकर (५२) या विधवा असून त्या शाळकरी मुला-मुलींसाठी खिचडी शिजविण्याचे काम करतात. या आगीत त्यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्यासह टि.व्ही., कुलर, फॅन, कपडे, धान्यसाठा व घराचा लाकुडफाटा जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.