अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींमधून निघतो गांजाचा धूर
By Admin | Updated: December 21, 2014 23:05 IST2014-12-21T23:05:34+5:302014-12-21T23:05:34+5:30
शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ दारूबंदी असताना जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकली जाते. सोबतच परजिल्ह्यांतून शहरात गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते़ यामुळेच शहरातील

अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींमधून निघतो गांजाचा धूर
वर्धा : शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ दारूबंदी असताना जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकली जाते. सोबतच परजिल्ह्यांतून शहरात गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते़ यामुळेच शहरातील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींमधून रात्रीच्या सुमारास गांजाचा धूर निघत असल्याचे दिसून येते़ पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शौकिनांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते़
महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे वास्तव्य राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी शहरापासून, गावखेड्यांपर्यंत खुलेआम दारूविक्री सुरू आहे. दारूसोबतच आता गांजाविक्रीचे प्रमाण वाढल्याने युवक व्यवनाच्या आहारी जात आहे. सध्या शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री सुरू आहे. छुप्या मार्गाने गांजाची विक्री केली जाते़ गांजाचे व्यसन जडलेली व्यक्ती दररोज गांजा ओढल्याशिवाय राहू शकत नाही़ यामुळे गांजा मिळविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला जातो. महाविद्यालयीन तरूणही या व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सायंकाळ होताच निर्जन स्थळी सदर शौकिन युवक गोळा होतात आणि मनसोक्त गांजा ओढतात.
शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम अर्धवट झालेले आहे. या इमारतींमध्ये सध्या अवैध व्यवसायांना उधाण आल्याचे दिसून येते़ ठाकरे मार्केटमध्ये असलेल्या नाट्यसभागृहात सायंकाळच्या सुमारास मद्यपिंचा धुमाकूळ असतो. या ठिकाणी पोलीस फिरकूनही पाहत नसल्याने मद्यपि मनसोक्त दारू रिचवत असून गांजाचे धूरसुद्धा निघताना दिसतात. अनेक तरूण सिगारेटमधील तंबाखू काढून त्यात गांजा भरून ओढतात.
शहरातील इतवारा चौक, पुलफैल, तारफैल, स्टेशनफैल, बोरगाव (मेघे), देवळी बायपास व शहरातील खिंडार इमारतींमधूनही गांजाचा धूर निघताना दिसतो. पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे़ पवनार येथील धामनदीच्या परिसरात मोकळ्या वातावरणात भरदिवसा युवक गांजा ओढताना दिसून येतात़ या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहत नसल्याने अवैध व्यवसाय सुरू आहे़ पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
(शहर प्रतिनिधी)