शहरात घरफोडी करणारी बालगुन्हेगारांची टोळी गजाआड
By Admin | Updated: January 11, 2016 01:50 IST2016-01-11T01:50:32+5:302016-01-11T01:50:32+5:30
शहरात चोऱ्या करून हैदोस माजविणारी बालगुन्हेगारांची टोळी शहर पोलिसांनी गजाआड केली. यात तीन बालगुन्हेगारांसह दोन सज्ञानांचा समावेश आहे.

शहरात घरफोडी करणारी बालगुन्हेगारांची टोळी गजाआड
दोन सज्ञानासह तीन बालकांचा समावेश
वर्धा: शहरात चोऱ्या करून हैदोस माजविणारी बालगुन्हेगारांची टोळी शहर पोलिसांनी गजाआड केली. यात तीन बालगुन्हेगारांसह दोन सज्ञानांचा समावेश आहे. या चोरट्यांनी शहरातील तीन चोऱ्यांनी कबुली दिली आहे. यात अटक करण्यात आलेल्या बालगुन्हेगारांना सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. या बालगुन्हेगारांसह किसना रमेश राऊत रा. बोरगाव (मेघे) याची कारागृहात रवानगी करण्यात आली, तर त्याची आई इंदूबाई रमेश राऊत रा. नांदगाव वडार झोपडपट्टी ता. हिंगणघाट हिला पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटकेत असलेला किसना राऊत हा या बालकांच्या साहाय्याने शहरात चोऱ्या करीत असल्याचे उघड झाले आहे. चोरीत लांबविलेला ऐवज त्याची आई इंदूबाई हिच्या हवाली करण्यात येत होता. ती या ऐवजाची विल्हेवाट लावीत होती. या पाच जणांकडून एका चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर गुन्ह्याची चोरट्यांनी कबुली दिली असली तरी त्यातील मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहर ठाण्यात बोरगाव (मेघे) येथे चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. शिवाय त्याच परिसरात चोरीच्या घटना वाढल्याचे शहर पोलिसांच्या लक्षात आले. या भागातील चोरट्यांवर आळा घालण्याकरिता शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले. यानुसार तपास सुरू असतानाच पोलिसांचा संशय किसना राऊत याच्यावर गेला. त्याला संशयीत म्हणून ताब्यात घेतले असता त्याने चोऱ्यांची कबुली दिली. शिवाय यात त्याने काही बालगुन्हेगारांची नावे दिली. तसेच चोरीतील मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याकरिता तो त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात येत असल्याची कबुली दिली. यावरून त्याची आई इंदूबाई राऊत हिला ताब्यात घेतले. तिनेही चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची कबुली दिली. यावरून दोघांना अटक करण्यात आली तर बाल गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांना सुधारगृहात रवाना करण्यात आले. चोरीचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, ठाणेदार मुरलीधर बुराडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले, सहायक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर निशाणे, जमादार प्रमोद जांभूळकर, गजानन गहुकर, विशाल बंगाले, सचीन वाटखेडे व रितेश शर्मा यांनी केली.(प्रतिनिधी)