Gandhi had changed his mind, not men! | गांधींनी माणसे नव्हे, मने बदलली होती!
गांधींनी माणसे नव्हे, मने बदलली होती!

ठळक मुद्देबाल साहित्य संमेलन । बालकवींनी जिंकली मने; रसिक श्रोत्यांनी दिली दाद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘गांधी माझे बाबा गं’ अशी आर्त हाक मारत तर कधी सर्वांमध्ये तो आधी होता, सर्वांमध्ये गांधी होता, माणसे बदलली नव्हती त्याने मने बदलली होती, अशी इतिहासाची उजळणी करीत पूर्णत: महात्मा गांधींना अर्पण केलेले बालकांचे कविसंमेलन बालसाहित्य संमेलनात गाजले. आचार्य विनोबा भावे विचारपीठावर सादर झालेल्या या कविसंमेलनाने आणि कथावाचनाने संमेलनाचा लौकिक वाढविला.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘हीच आमुची प्रार्थना’ या गीताने झाली. संमेलनाच्या पाचव्या सत्रातील बालकवींच्या काव्यसादरीकरणाने बालरसिकांसोबतच मोठ्यांनाही जिंकून घेतले. या सत्राची सुरूवात बोपापूर (वाणी) येथील जिल्हा परिषद शाळेतील आचल लोहकरे या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने केली. ‘बापू, परतुनी या भूमीवरी’ असे म्हणणारी आचल नैसर्गिक बदलामुळे ‘शेतकरी झाला उदास, त्यांना हवा तुमचा आधार’ अशी विनवणी गांधीजींना करून गेली. एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर तुम्ही कसा केला? अशी विचारणा यवतमाळच्या यश चव्हाण याने आपल्या कवितेतून केली. ‘सूर्य मावळला तरी मिटणार नाही तुझी आस’ अशी भावना नागपूरच्या आशीषा घुळघुळे हिने व्यक्त केली. तर, बेलतरोडी येथील सानिका कांबळे हिने युगपुरुष महात्मा गांधी ही कविता सादर केली.
सर्वांमध्ये तो गांधी होता, असे म्हणणारी गडचिरोलीची आर्या गोट्टमवार कवितेचा समारोप करताना लोकांमधला गांधी आता हरवत चालला आहे अशी खंत व्यक्त करून गेली. ‘बापू, भारताच्या नवनिर्मितीचा मार्ग तुम्ही दाखवला’ हे श्रेयस देलमाडे आपल्या कवितेतून सांगून गेला. तर, बापूंच्या स्वप्नांचा भारत आम्ही साकार करणार, अशी ग्वाही वरदा बिडवाई (अकोला), रोशनी मेहेत्रे (कौलखेडा), आस्था घरडे (चंद्रपूर) या बालकवयित्री आपल्या कवितेतून देऊन गेल्या. मानसी गौळकार या वर्धेकर बालकवयित्रीने ‘गांधी माझे बाबा गं’ या ओवीबद्ध कवितेतून गांधीजींच्या हत्येचे चित्र उभे करीत सभागृहाला अंतर्मुख केले.
रेवती भुईभार (अकोला), चिन्मया खडसे (गडचिरोली), मधुरा बोके (धामणगाव), सृष्टी ठाकरे (वरूड), नम्रता बोरकुटे, अनुश्री विसवेकर (वानाडोंगरी), आदित्य मेश्राम (नागपूर) या विद्यार्थ्यांनीही गांधींवरील कविता सादर केल्या. बुलडाणा येथील ज्येष्ठ कवी अमर कोठारी यांच्या ‘बापू तुमची काठी ’या कवितेने या कविसंमेलनाची सांगता झाली. आर्या कडूकर व हिमांशू साळवे या विद्यार्थ्यांनी कविसंमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

कथांमधून दिली गांधीविचारांची शिकवण
बापूंच्या गोड गोष्टी या कार्यक्रमात सुभाष किन्होळकर (बुलडाणा) या ज्येष्ठ कथाकारासोबतच कांचन कवडे, ऋतिका उजाडे, आदित्य गाडगीळ (अकोला), वेदिका मंगळगिरी (गडचिरोली), कृत्तिका भूत (धामणगाव), वेदांती दाभणे, कल्याणी देशमुख, ओवी मोडक, अर्णव कामडी (नागपूर), अर्णवी घाटे, जान्हवी बावनकर (वर्धा), कल्याणी कावळे (वरूड), अदिती वासाडे (अमरावती), रुद्रप्रताप गायकवाड (यवतमाळ) या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांवर आधारित कथा उत्कृष्ट शैलीत सादर केल्या. दोन हजार पुस्तकांचे वाचन केलेली अकोल्याची गार्गी भावसार ही ११ वर्षांची कथाकारही या सत्रात सहभागी झाली होती. कथावाचनातून बालकथाकारांनी गांधीविचारांची शिकवणच दिली. कार्यक्रमाचे संचालन अनिशा घाटे व आर्या लोखंडे या विद्यार्थिनींनी केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत चन्ने, वामन तेलंग, विलास मानेकर, शुभदा फडणवीस, आभा मेघे व संजय इंगळे तिगावकर, यांच्या हस्ते सर्व बालसाहित्यिकांना व सांस्कृतिक सादरीकरणातील कलावंतांना पुस्तक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Gandhi had changed his mind, not men!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.