आर्वी नाका परिसरात चालला गजराज

By Admin | Updated: December 10, 2015 02:13 IST2015-12-10T02:13:08+5:302015-12-10T02:13:08+5:30

शहरात वाढलेल्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे.

Gajraj walked out of Arvi Naka area | आर्वी नाका परिसरात चालला गजराज

आर्वी नाका परिसरात चालला गजराज

नगर परिषदेची कारवाई : गरिबांचेच अतिक्रमण काढल्याचा आरोप
वर्धा : शहरात वाढलेल्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. यांतर्गत बुधवारी आर्वी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे बड्या व्यावसायिकांना बगल देत पुन्हा लहान व्यावसायिकांवरच कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने संताप व्यक्त होत होता.
पालिकेच्या वतीने नव्याने अतिक्रमण हटाव मोहीम मंगळपासून सुरू करण्यात आली. यावेळी बसस्थानक परिसरातील काही भागात ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर पालिकेने बुधवारी आपला मोर्चा आर्वी नाका परिसराकडे वळविला. या काही वर्षात आर्वी नाका चौकात वस्ती व त्यापाठोपाठ वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने वाढून अतिक्रमणही वाढू लागले आहे. सोबतच अनेक छोट्या व्यावसायिकांनीही आपली दुकाने व टपरी टाकली आहे. परिणामी येथील वाहतूक प्रभावित होऊन अपघात वाढले आहे. यावर आवर घालून रस्ते मोकळे करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने बुधवारी आर्वी नाका चौकात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वढार झोपडपट्टीला लागून असलेल्या जागेवर किरकोळ व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. सोबतच म्हाडा कॉलनीकडे जात असलेल्या मार्गावर असलेल्या कॉम्प्लेक्समधील आणि त्यासमोर अनधिकृतरित्या थाटलेल्या भाजीविक्रेत्यांवर कारवाईचा बदगा उगारण्यात आला. सोबतच धुनिवाले चौकाकडे जात असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणही हटविण्यात आले. विशेष म्हणजे कुठलेही नुकसान न करता ही कारवाई करण्यात आली. संपूर्ण अतिक्रमण काढून ते साहित्य उचलून नेतपर्यंत पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना तगडा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. कारवाईच्या वेळी नगर पालिकेचे अभियंता सुधीर फरसोले, अशोक ठाकूर, निखिल लोहवे, लिलाधर निखाडे, शिवाजी थोरात, तुषार गोळघाटे, प्रमोद तामगाडगे, दिलीप तराळे तर पोलीस कर्मचारी भगवान बावणे, दिलीप राठोड, राजेंद्र ठाकरे, अलका टिपले यांची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)

कारवाईदरम्यान बुधवारी अतिक्रमणधारकांकडून ५० हजाराचा दंड पालिकेद्वारे वसुल करण्यात आला.
नगर पालिकेद्वारे ही मोहीमच राबविली जात असल्याने गुरुवारीही शहरातील अतिक्रमणग्रस्त भागात पालिकेचा गजराच चालणार असल्याचे नगरपालिकेद्वारे सांगण्यात आले आहे.

कालचे अतिक्रमण आज जैसे थे
पालिकेच्या वतीने मंगळवारी बसस्थानक परिसरापासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. हीच मोहीम बुधवारी आर्वी नाका चौकात राबविण्यात आली. परंतु बसस्थानक परिसरात बुधवारी फेरफटका मारला असता मंगळवारी काढलेले अतिक्रमण आज जैसे थे पहावयास मिळाले.
किरकोळ व्यावसायिकांवरच कारवाईचा बडगा
आर्वी नाका चौकात अनेक किरकोळ व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यावर बडगा उगारण्यात आल्याने केवळ छोट्या व्यावसायिकांवरच कारवाई करीत बड्यांवर मात्र पालिकेची मेहेरनजर असल्याचा आरोप केला जात आहे.

Web Title: Gajraj walked out of Arvi Naka area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.