आर्वी नाक्यावरील अतिक्रमणावर चालला गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:07+5:30
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने प्रशासन खडाडून जागे झाले आणि पुन्हा दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला.

आर्वी नाक्यावरील अतिक्रमणावर चालला गजराज
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचे संकट लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहे. पण, आर्वी नाका परिसरात हातगाडीचालकांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने आर्वीनाका ते कारला रस्त्यावरील तसेच आयटीआय कॉलेजमार्गावर करण्यात आलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने प्रशासन खडाडून जागे झाले आणि पुन्हा दोन दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. दोन दिवसांच्या लॉकडाऊनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिलता आणत पूर्वीप्रमाणे दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंतच उघडण्यास मुभा दिली. पण, शहरातील आर्वीनाका परिसरात भरणाऱ्या भाजीबाजारामुळे आणि रस्त्याकडेला लागणाऱ्या फळविक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे गर्दी उसळली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले होते.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी प्रशासनाने अनेकदा नागरिकांना गर्दी न करण्याच्या सूचनाही दिल्या.
पण, फळविक्रेते आणि भाजीविक्रेत्यांनी प्रशासनाचे आदेश धुडकवून टाकले. होणाऱ्या गर्दीमुळे विषाणू संसर्गाचा धोका होण्याची शक्यता असल्याने अखेर बुधवारी नगरपालिकेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात आर्वी मार्गावरील हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.
तसेच हातगाड्या जप्त करीत विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयटीआय कॉलेजकडे जाणाऱ्या मार्गावरही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई नगर पालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.
पालिका कर्मचाऱ्यांची अरेरावी
आर्वीनाका परिसरात अतिक्रमण काढत असताना रस्त्याने ये-जा करणाऱ्यांशी पालिकेचे कर्मचारी अरेरावी करीत होते. रस्त्याने एक शेतकरी जात असताना पालिकेच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याशी हुज्जत घातली. दोघांमध्ये वादावादीही झाली. त्यामुळे जनतेच्या हितार्थ कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जनतेलाच वेठीस धरू नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.