शहरातील अतिक्रमणावर चालला गजराज
By Admin | Updated: March 26, 2015 01:47 IST2015-03-26T01:47:43+5:302015-03-26T01:47:43+5:30
मंगळवारी महामार्गावरील अतिक्रमण हटविल्यानंतर बुधवारी शहरातील मुख्य मार्गावरील नागपूर रोड पेट्रोलपंप ते विठोबा चौकापर्यंतच्या रस्त्याच्या...

शहरातील अतिक्रमणावर चालला गजराज
हिंगणघाट : मंगळवारी महामार्गावरील अतिक्रमण हटविल्यानंतर बुधवारी शहरातील मुख्य मार्गावरील नागपूर रोड पेट्रोलपंप ते विठोबा चौकापर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूचे अतिक्रमण हटविण्यात आले. याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे अतिक्रमण गुरूवारी हटविण्यात येणार आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेचा बुधवार हा दुसरा दिवस होता. मोहिमेचा धडाका पाहून अतिक्रमण धारकांनी स्वत:च आपले ठेले, दुकान, अतिक्रमण हटवून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. काहींनी वेळेच्या आत अतिक्रमण न काढल्याने त्यांचे नुकसान झाले़ रस्त्याच्या कडेला पानटपऱ्या, ठेले, विटा सिमेंटचे बांधकाम, टिनाचे शेड, दुकाने आदी प्रकारचे सर्व अतिक्रमण हटविण्याची मोहीम बुधवारीही तेवढ्याच वेगाने सुरू होती़ यापूर्वीच शहरात अतिक्रमण हटविण्याची सूचना सार्वजनिकरित्या देण्यात आली होती. नागपूर रोडवरील पेट्रोलपंपापासून रस्त्याच्या एका बाजूने मोहीम सुरू करण्यात आली. डॉ. आंबेडकर शाळा, बसस्थानक, जुने बसस्थानक, डॉ. आंबेडकर चौक, श्रीराम टॉकीजच्या परिसरापर्यंत ही मोहीम राबविली़ या मार्गावरील शेकडो अतिक्रमणांना हटविण्यात आल्याने शहरात सर्वत्र भग्नावशेष दिसून येत होते़ यात अतिक्रमण धारकांच्या संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले.
बुधवारी पार पडलेल्या कारवाईमध्ये न.प. अभियंता विश्वनाथ माळवे, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पिंपळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चांभारे तसेच नगर परिषदेचे कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सहभागी झाले होते़(शहर प्रतिनिधी)
सूचनेकडे कानाडोळा करणाऱ्यांच्या संपत्तीचे झाले नुकसान
दोन दिवसांपासून शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे़ बुधवारी दुसऱ्या दिवशी शहरातील नागपूर रोड पेट्रोल पंप ते विठोबा चौकापर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात आले़ यात काहींनी स्वत:च आपले अतिक्रमण काढून घेतले; पण जे मोहिमेबाबत दिलेल्या सूचनेलाही जुमानले नाहीत, त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले़ गजराजाच्या साह्याने सदर अतिक्रमण ध्वस्त करण्यात आले़
गुरूवारी शहरातील विठोबा चौक ते नागपूर रोड पेट्रोल पंपाकडे परत जाणाऱ्या रस्तावरील दुसऱ्या बाजूचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे़ यानंतर श्रीराम टॉकीज ते अभ्यंकर शाळा या रस्त्यावरील अतिक्रमण काढले जाणार आहे़