अनैतिक संबंधातून झाली गजाननची हत्या
By Admin | Updated: March 25, 2015 02:05 IST2015-03-25T02:05:15+5:302015-03-25T02:05:15+5:30
गुढीपाडव्याच्या दिवशी जामठा शिवारात गजानन जेठीया रा. इतवारा बाजार याचा मृतदेह आढळून आला.

अनैतिक संबंधातून झाली गजाननची हत्या
वर्धा : गुढीपाडव्याच्या दिवशी जामठा शिवारात गजानन जेठीया रा. इतवारा बाजार याचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता त्याची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली. परमेश्वर निकोडे रा. इंझापूर व हनुमान राऊत रा. पिपरी (मेघे) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस सुत्रानुसार, शनिवारी जामठा शिवारातील नाल्यात एका इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलीस पाटलाने सेवाग्राम पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता मृतकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले. प्रारंभी अनोळखी असलेल्या मृताकची ओळख पटली. त्याचे नाव गजानन जेठीया असे असल्याचे समोर आले. तो वर्धेच्या इतवारा बाजार परिसरातील असून गत काही वर्षांपासून तो बुलडाणा जिल्ह्यात कामानिमित्त वास्तव्यास असल्याचे समोर आले. तो २० तारखेला वर्धेत येणार होता अशी माहिती गजाननच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र तो घरी पोहोचला नाही तर त्याचा मृतदेहच मिळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली.
प्रकरणाचा तपास सुरू असताना गजानन याचे इंझाळा येथील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी तपास केला असता त्या महिलेचे परमेश्वर निकोडे याच्याशीही अनैतिक संबध असल्याचे समोर आले. यावरुन परमेश्वरला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने गजाननची हत्या केल्याची कबुली दिली. त्याला या कटात हनुमान राऊत याची मदत मिळाल्याचे समोर आले. या दोघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)