जागेच्या वादातून गजानननगरात तणाव
By Admin | Updated: August 27, 2015 02:15 IST2015-08-27T02:15:38+5:302015-08-27T02:15:38+5:30
शहरातील गजानन नगर परिसरातील विठ्ठल मंदिर टेकडीवरील मस्जिदजवळील भागात गंगाधर पाटील नामक इसमाने येथील नागरिकांची घरे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला.

जागेच्या वादातून गजानननगरात तणाव
जेसीबीमार्फत घरे पाडण्याचा प्रयत्न : नागरिकांना वारंवार धमकावणी
वर्धा : शहरातील गजानन नगर परिसरातील विठ्ठल मंदिर टेकडीवरील मस्जिदजवळील भागात गंगाधर पाटील नामक इसमाने येथील नागरिकांची घरे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता. वारंवार हा प्रकार होत असल्याने या भागातील नागरिकही संताप व्यक्त करीत आहेत.
येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधर पाटील नावाचा इसम या परिसरातील प्लॉट आपल्या मालकीचे असल्याचे सांगत नागरिकांना अनेक वर्षांपासून धाकदपट करीत आहे. दुपारी घरातील पुुरुष मंडळी बाहेर गेली असताना हा मुुद्दाम येऊन धमकी देत असल्याचेही महिला सांगतात.
१० ते १५ वर्षांपासून येथे नागरिक वास्तव्यास आहेत. यात काही मुस्लिम समुदायाचीही घरे आहेत. या भागातील काही नागरिकांनी त्यांची जागा शालीग्राम संजय टिबडेवाल यांच्याकडून तर काहींनी शिवम मदनलाल यांच्याकडून जागा घेतल्याचे नागरिक सांगतात. परंतु गंगाधर पाटील मात्र ही सर्व जागा आपली असल्याने ती खाली करण्याची धमकी देत असल्याचे महिलांनी सांगितले.
बुधवारी दुपारच्या वेळी पाटील याने अचानक जेसीबी घेऊन येत येथील सतीश ईंगळकर यांचे घर पाडण्याचा प्रयत्न केला. यात त्याला रोखण्याच्या नादात त्यांची पत्नी मंजुषा या जखमीही झाल्या इतरही घरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. येथील मस्जिदीवरही त्याने जेसीबी चालविण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले.
यादरम्यान वर्धा पोलिसांची चमू दाखल झाल्यामुळे प्रकारण निवळले. पण हा प्रकार आता नित्याचाच झाला असून यामुळे येथील महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी त्याला पोलिसांनी समज दिल्याचेही सांगण्यात आले.(शहर प्रतिनिधी)
यापूर्वीही अनेकवार तक्रारी दाखल
विठ्ठल मंदिर टेकडीवरील आय. टी. आय जवळ शालीग्राम तिबडेवाल यांच्याकडून काही नागरिकांनी जमिनी घेऊन पक्की घरे बांधल्याचे नागरिक सांगतात. या जागेची कागदपत्रेही त्यांच्याकडे आहेत. परंतु गंगाधर पाटील हा इसम ही सर्व जागा माझ्या मालकीची असून ती लवकर खाली करा, अशी धमकावणी अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना देत आहे. आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचेही तो सांगत असतो. येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सर्वप्रथम १२ जुलै २००७ मध्ये त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली होती. यानंतरही अनेकवार त्याने घरे पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे वारंवार पोलिसांत तक्रार केल्याचेही नागरिक सांगतात. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही नागरिक करीत आहे.
बुधवारी गंगाधर पाटील याने पुन्हा जेसीबीद्वारे सतीश इंगळकर यांचे घर पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांंमुळे हा प्रकार टळला. नागरिकांनी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु त्यास समज दिल्याचे सांगण्यात येते.
दुपारी महिलांना होतो त्रास
दुपारच्या वेळेस घरातील पुरूष मंडळी ही कामानिमित्त बाहेर गेलेली असते. नेमकी हीच संधी साधत गंगाधर पाटील हा येथे येऊन धमकावणी देत असल्याचे महिला सांगतात.बुधवारी घडलेल्या प्रकारामुळे येथे पुन्हा एकवार तणाव निर्माण झाला होता. तक्रार करूनही पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचे महिला सांगतात. पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वंदना दरवळकर, मंजुषा इंगळकर, अरविंद सायरे, राजू माने, पुरूषोत्तम कदम आदींनी केली आहे.