गाडेगाव ग्रा.पं.त अफरातफर
By Admin | Updated: August 30, 2015 02:01 IST2015-08-30T02:01:46+5:302015-08-30T02:01:46+5:30
तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतीचा घोळ जिल्हा परिषदेत गाजत असतानाच हिंगणघाट तालुक्यातील गाडेगाव ...

गाडेगाव ग्रा.पं.त अफरातफर
पोलिसात तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.ला निवेदन सादर
वर्धा : तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतीचा घोळ जिल्हा परिषदेत गाजत असतानाच हिंगणघाट तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायतीतही माजी सरपंचाने जिल्हा परिषदेच्या जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत आलेला ३० हजार रुपयांचा निधी परस्पर हडपल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी अल्लीपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकारी व जि.प. प्रशासनाला निवदेन सादर करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषदेंतर्गत गाडेगाव ग्रामपंचायतीला जलस्वराज्य विभागाकडून पाणीपुरवठा योजनेकरिता १४ लाख व महिला सश्रमीकरणकरिता ३० हजार रुपये फिरते भांडवल म्हणून मिळाले होते. १४ लाख रुपयात पिण्याच्या पाण्याची विहीर आणि टाकीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले. ३० हजार रुपयांची रक्कम बचत गटाला फिरत्या भांडवलाच्या स्वरूपात देण्यात यावे, असे आदेश असताना देखील तत्कालीन पाणी पुरवठा समिती अध्यक्ष आणि माजी सरपंच शालिक ताकसांडे यांनी पदाचा गैरवापर करून इतर गटाला रक्कम न देता पत्नीच्या नावे असलेल्या प्रगती बचत गटाला दिले. सदर रक्कम गत सात वर्षांपासून एकाच गटाकडे असल्यामुळे गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली होती.
त्यावर ताकसांडे यांनी सदर रक्कम २५ जून २०१० पर्यंत परत करण्याची लेखी हमी दिली होती. मात्र तसे झाले नाही. विद्यमान सरपंच राजूरकर हे ताकसांडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. या प्रकरणात अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात शालिक ताकसांडे, आशा रामकृष्ण डुबडुबे, मारोती राजूरकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)