वनकामगारांचे आमरण उपोषण
By Admin | Updated: August 9, 2015 02:12 IST2015-08-09T02:12:30+5:302015-08-09T02:12:30+5:30
वनविभागातील विविध कामांसाठी ठेवण्यात आलेल्या बारमाही वनकामगारांना अचानक कामावरून बंद केले.

वनकामगारांचे आमरण उपोषण
अचानक कामावरून केले कमी : दोन दिवसानंतरही प्रशासन सुस्त
आष्टी : वनविभागातील विविध कामांसाठी ठेवण्यात आलेल्या बारमाही वनकामगारांना अचानक कामावरून बंद केले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात एका कर्मचाऱ्याने आमरण तर चौघांनी साखळी उपोषण वनविभागाच्या कार्यालयासमोर सुरू केले आहे. दोन दिवस लोटूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
वर्धा जिल्ह्यातील वनविभागाच्या सेवा जेष्ठता यादीमध्ये २२ वनकामगार कार्यरत होते. यापैकी आष्टी तालुक्यातील ४ कर्मचारी कार्यरत होते. वनविभागाने ३ जून १९९१ साली मोई येथील बाला पवार यांना आॅर्डर दिली. त्यांना सेवाजेष्ठता यादीप्रमाणे नियमीत केले नाही. सेवानिवृत्तीचे वय संपले असल्यावरून कामावरून कमी करण्यात येत असल्याचे पत्र देऊन वनविभाग मोकळा झाला. याविरोधात पवार यांनी उपवनसंरक्षक वर्धा यांच्याकडे पत्रव्यवहार केला. मात्र ह्याचा काहीच फायदा झाला नाही. शिवाय विशाल खोडे, गुलाब केवटे, दिलीप मडावी, प्रितम वानखडे या चारही कर्मचाऱ्यांवरदेखील अन्याय झाला आहे. याविरोधात ७ आॅगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. याकडे वनविभागाचे अधिकारी अद्याप फिरकले नाही.
वनविभागातील बारमाही वनकर्मचाऱ्यांनी एफडीसीएम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही फायदा झाला नाही. प्लॅन्टेशनच्या कामावर मजुरांना लावण्यात आले नाही. वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवा देवूनही पेन्शनसुविधा नाही. उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल केले जाते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे, वनविभागात कामे असूनही अधिकाऱ्यांनी कामे दिली नाही. त्यामुळे वनकर्मचारी अरूण उईके, उमरी सावरकर, संगीता कुचकार, आदिनाथ मानकर, अशोक वानखडे आष्टी, जनार्दन पाटील, सरस्वता कानोडे, शेवंता परतेकी या कर्मचाऱ्यांना मृत्यू ओढवला. त्यांना कोणतीही मदत दिली नाही. यासह अनेक मागण्या शासनदरबारी पडून आहे. अधिकारी वेळ काढूपणाची भूमिका राबवित असून न्याय देत नाही.
उपोषण मंडपात बसलेले बाला पवार यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यावर प्रशासनाने तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे. आष्टी वनपरिक्षेत्राप्रमाणेच जिल्ह्याची स्थिती आहे.
सामाजिक वनीकरण कार्यालयानेही असाच प्रकार केला आहे. वनकर्मचारी यांना कामे दिल्या जात नाही. कुटूंब कसे पोसावे असा प्रश्न मजुरांसमोर आहे.(प्रतिनिधी)
एकाची प्रकृती खालावली
वनविभागातील बारमाही वनकर्मचाऱ्यांनी एफडीसीएम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही फायदा झाला नाही.
प्लॅन्टेशनच्या कामावर मजुरांना लावण्यात आले नाही. वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवा देवूनही पेन्शनसुविधा नाही. उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल केले जाते.
अधिकारी वेळ काढूपणाची भूमिका राबवित असून न्याय देत नसल्याची ओरड होत आहे.