रद्दी विकून विद्यार्थ्यांनी उभारला कॅन्सरग्रस्तांसाठी निधी

By Admin | Updated: February 28, 2016 02:17 IST2016-02-28T02:17:56+5:302016-02-28T02:17:56+5:30

स्थानिक बापूराव देशमुख अभियांत्रिकी महा.तील विद्यार्थ्यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करता यावी म्हणून ...

Funds for cancer related cancer raised by students by selling junk | रद्दी विकून विद्यार्थ्यांनी उभारला कॅन्सरग्रस्तांसाठी निधी

रद्दी विकून विद्यार्थ्यांनी उभारला कॅन्सरग्रस्तांसाठी निधी

अभिनव उपक्रम : बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शक्कल
वर्धा : स्थानिक बापूराव देशमुख अभियांत्रिकी महा.तील विद्यार्थ्यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करता यावी म्हणून या विद्यार्थ्यांनी पेपर रद्दी विकून निधी उभा करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. कॅन्सरग्रस्तांना मदत या मुख्य उद्देशाने सेवाग्राम येथून मुख्य ठिकाणी पेपरची रद्दी जमा करीत ९ हजार ६३० रुपये प्राप्त केले आहेत. ही रक्कम प्रयास सेवांकुर या संस्थेला देण्यात येणार आहे.
सामान्यांतील मानवता आणि उदारता याचा प्रत्यय रद्दी जमा करताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना येत आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींनीही रद्दी देत या उपक्रमात सहभाग घेतला आहे. सकाळपासून सायकल, मोटर सायकलद्वारे नागरिकांनी सेवाग्राम चौकात रद्दी आणून दिली. शिवाय मुला-मुलींच्या वसतिगृहातूनही रद्दी गोळा करण्यात आली. हा उपक्रम सेवाग्राम येथेच थांबला नाही तर दुसरा टप्पा वर्धा शहरात सुरू करण्यात आला आहे. शहरातील ठाकरे मार्केटसह अन्य काही ठिकाणी रद्दी गोळा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
लाखो लोक कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत जगत आहेत. कॅन्सरग्रस्त नागरिकांची लढाई लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा पेपर रद्दी संकलनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यातून समाजातील परोपकाराबाबतच्या संवेदनेला बळ मिळावे, तरूणाईची ताकद विधायक उपक्रमांमध्ये वळावी, चांगल्या विचार व कृती करणाऱ्यांची साखळी निर्माण करता यावी हा यामागील उद्देश होय. या युवकांनी ९८० किलो पेपर रद्दी जमा केली. ही सर्व रद्दी १० रुपये किलो. या किंमतीने विकण्यात आली.
या उपक्रमाला बा.दे. महा.चे प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. बा.दे. अभियांत्रिकी महा.च्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा उपक्रम सामान्यांनाही पटू लागल्याचे दिसून येत आहे. याबाबत जनजागृती होणेहीे गरजेचे झाले आहे. सेवाग्राम येथे नागरिकांनी स्वत: आपल्या घर, दुकानातील रद्दी आणून दिली. अन्य शहरातही नागरिकांनी पुढाकार घ्यावा व सहकार्य करावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Funds for cancer related cancer raised by students by selling junk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.