विजेअभावी चारा व बागायती पिके सुकली
By Admin | Updated: May 20, 2015 02:28 IST2015-05-20T02:28:32+5:302015-05-20T02:28:32+5:30
नजीकच्या एकपाळा शिवारातील विद्युत पुरवठा गत १० दिवसांपासून बंद आहे.

विजेअभावी चारा व बागायती पिके सुकली
देवळी : नजीकच्या एकपाळा शिवारातील विद्युत पुरवठा गत १० दिवसांपासून बंद आहे. यामुळे त्या भागातील बागायती पिके आणि बैलांचा हिरवा चारा सुकला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
शहर विभागाच्या अभियंत्याच्यास कामचुकार प्रवृत्ती, अरेरावी व नेहमी गैरहजर राहण्याच्या सवयीमुळे परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. तक्रारींची दखल न घेता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. कधी कार्यालयीन बैठकांचे तर कधी विद्युतशी संबंधित तांत्रिक अडचणीचे कारण सांगून ते नेहमीच गैरहजर राहतात, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे येथील कार्यालय बेवारस ठरले आहे. दिवसभार या कार्यालयात कुणीही कर्मचारी हजर राहत नसल्याने समस्यांबाबतची तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभियंता व लाईनमन यांच्यात कामांचे नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
एकपाळा येथील ग्रामस्थांना १० दिवसांपासून काळोखात खितपत जगावे लागत आहे. वीज पुरवठा खंडित असल्याने शेतातील गुरांचा हिरवा चारा, पिके सुकली आहेत. शिवाय गावातही काळोखाचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांना चाचपडावे लागत आहे. वेळी-अवेळी खंडित होणारा वीज पुरवठा व भारनियमन यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शहरातील दिवाबत्तीशी संबंधित समस्याही नित्याच्या असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. एकपाळा येथील वीज सुरळीत करण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)