लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जुलै ते ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील संत्रावर्गीय फळपिकांचे नुकसान झाले होते. याचा फटका आर्वी तालुक्यात जास्त बसला होता. या नुकसानाची दखल घेत राज्य सरकारने आर्वी तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना १०८४.९८ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तसा आदेश मंगळवार २१ जानेवारी रोजी महसूल विभागाने काढला आहे.
सन २०२४ मध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. सरकारकडे मदत मिळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शासन व प्रशासाने उंबरठे झिजवले होते. जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. याची दखल घेत सरकारने फळ उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
३०१३.८५ हेक्टरचे नुकसान सन २०२४ च्या खरीप हंगामाच्या सुरूवातीला म्हणजे जुलै व ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते. त्यामुळे अनेक संत्रा व अन्य फळ बाग शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्याचा हंगाम वाया गेला होता. जिल्ह्यातील ३०१३.८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार ९३३ शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठविले होते.
ढगाळ वातावरणामुळे बसला होता फटका जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात ढगाळ वातावरण व सतत पाऊस पडत होता. त्यामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे फळगळतीमुळे नुकसान झाले. विशेष फळपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदतीची मागणी १५ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आली होती. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.