टॉवर हटविण्यासाठी ग्रा.पं.वर रहिवाश्यांचा मोर्चा
By Admin | Updated: May 7, 2015 01:34 IST2015-05-07T01:34:41+5:302015-05-07T01:34:41+5:30
रहिवाश्यांची सहमती न घेता उभारण्यात आलेले टॉवर हटविण्यात यावे या मागणीकरिता सिंदी (मेघे) ग्रामपंचायत कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा नेण्यात आला.

टॉवर हटविण्यासाठी ग्रा.पं.वर रहिवाश्यांचा मोर्चा
वर्धा : रहिवाश्यांची सहमती न घेता उभारण्यात आलेले टॉवर हटविण्यात यावे या मागणीकरिता सिंदी (मेघे) ग्रामपंचायत कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा नेण्यात आला. यात परिसरातील नागरिकांनी वॉर्ड क्रमांक ३ येथे ४ जी सेवेकरिता उभारलेले रिलायंस टॉवर हटविण्याची मागणी लावून धरली. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार देण्यात आली असून माहिती अधिकार कायद्यातंर्गत ग्रामपंचायत प्रशासनाकडे माहिती मागविली आहे.
येथील वॉर्ड क्रमांक ३ येथे ४ जी सेवेकरिता टॉवर उभारण्यात आले. याकरिता ग्रामस्थांची सहमती सभा घेणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने असे न करता परस्पर परवानगी दिली. या भागात दाट वस्ती आहे. शिवाय या टॉवरमधील लहरींचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याचा धोका आहे. या भागात रिकाम्या जागेवर लहान मुले खेळत असतात. या भागात अधिक प्रमाणात टॉवर उभारले असल्याने पुन्हा टॉवर उभारण्याकरिता परवानगी देऊ नये असा पवित्रा ग्रामस्थांनी यावेळी घेतला होता. ग्रामस्थांनी मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, यांना ४ जी सेवेकरिता टॉवर उभारणीबाबत लेखी तक्रार दिली. यापूर्वी दिलेल्या तक्रारीची ग्रामविकास अधिकारी यांनी दखल घेतली नाही. यामुळे माहिती अधिकार कायद्यांतर्गत ग्रामस्थांनी माहिती मागविली. यात प्राप्त झालेल्या माहितीत टॉवर उभारणी करताना एन.ओ.सी व इलेक्ट्रीक सप्लायची एन.ओ.सी. देण्यात आली नाही, शिवाय सहमती सभा घेतली नाही, अशी माहिती प्राप्त झाली. यामुळे ग्राम्स्थांनी याबाबत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालयसमोर निदर्शने देण्यात आली. या आंदोलनात विजय नगराळे, सचिन बमनोटे, धर्मराज वैद्य, उमेश दरणे, दत्ता वैद्य, किशोर बाहे, राजेश बोरकर, युवराज वैद्य, अरूण जंगठे, नंदकिशोर धाबर्डे, जयपाल भस्मे, वालदे, मेशेकर, तिरभाने, रोशन राऊत, पुरूषोत्तम आत्राम, मारोतराव शेळके, भावना नगराळे, मीनाक्षी बमनोटे, महल्ले, गोल्हर, शिंदे, साखरकर, वालदे, निकोडे, बोरकर, गायधने यासह नागरिकांचा सहभाग होता. ग्रामपंचायत प्रशासनाने टॉवर हटविण्याच्या कारवाई करण्याबाबत जोपर्यंत कोणतीच हमी दिली नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांनी तळ ठोकून आंदोलन केले होते.(स्थानिक प्रतिनिधी)