जिल्ह्यात आघाडीचे दर्शन

By Admin | Updated: September 15, 2014 00:15 IST2014-09-15T00:15:44+5:302014-09-15T00:15:44+5:30

जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी रविवारी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत जिल्ह्यात आघाडीचे दर्शन घडले. विधानसभा निवडणुकीच्या डोळ्यासमोर

Frontal philosophy in the district | जिल्ह्यात आघाडीचे दर्शन

जिल्ह्यात आघाडीचे दर्शन

आठही पंचायत समितीच्या निवडणुका : समुद्रपुरात भाजप-राष्ट्रवादीचा काडीमोड; सेलूत सत्ताबदल
वर्धा : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी रविवारी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत जिल्ह्यात आघाडीचे दर्शन घडले. विधानसभा निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीचे गणित मांडले गेल्याचे निकालांवरुन दिसून येते. मात्र आष्टी आणि कारंजा या दोन समित्यांच्या निवडणुका अपवाद ठरल्या. या दोन्ही पंचायत समिंत्यांवर भाजपने राष्ट्रवादीच्या सहायाने सत्ता हस्तगत केली. तर सेलूत सरळ भाजप-सेना युतीने सत्ता स्थापन केली. इतर पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस-राकाँ आघाडीने सत्ता स्थापन केली.
वर्धा पंचायत समिती आघाडीने कायम ठेवण्यात यश मिळविले. सभापतिपद काँग्रेस व उपसभापतिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. देवळीत काँगे्रसचा एकछत्री अंमल कायम राहिला. आष्टी पंचायत समितीत सत्ता स्थापनेकरिता भाजप-राकाँत अभद्र युती झाली. यातही राष्ट्रवादीच्या सदस्यात मतभेद असल्याने भाजपचे फावले. सभापती व उपसभापतिपद भाजपनेच बळकावले. हिची स्थिती कारंजा पंचायत समितीत बघायला मिळाली. येथेही भाजप-राकाँ युती सत्तेवर आली. सभापतिपद भाजप व उपसभापतिपद राकाँच्या वाट्याला आले. हिंगणघाट पंचायत समितीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने सत्ता कायम राखली. सभापतिपद राकाँ तर उपसभापतिपद काँग्रेसच्या वाट्याला आले. समुद्रपूर पंचायत समितीत राकाँने भाजपशी काडीमोड घेत काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन केली. सभापती व उपसभापतिपद राकाँच्या वाट्याला आले. सेलू येथे काँग्रेसचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने भाजप-सेना युतीने सत्तेत आली. सभापतिपद भाजप तर उपसभापतिपद शिवसेनेच्या वाट्याला आले. विशेष म्हणजे, दोन्ही पदांवर महिलांची वर्णी लागली. आर्वीत आरक्षणानुसार एकमेव उमेदवार असल्याने येथे काँग्रेसच्या सहकार्याने स्वभापकडे सभापतिपद आले, तर ईश्वरचिठ्ठीने उपसभापतिपदी भाजपचा उमेदवार विजयी झाला.(लोकमत न्यूज नेटवर्क)
वर्धेत पुन्हा आघाडीचीच सत्ता
सभापतिपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव असलेल्या वर्धा पंचायत समितीत झालेल्या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम ठेवली. येथे पूर्वीप्रमाणेच सभापती पद काँग्रेस व उपसभापती पद राकाँच्या वाट्याला आले. यात सभापती म्हणून केळापूर सर्कलच्या कुंदा प्रमोद भोयर यांची वर्णी लागली तर उपसभापतिपदी राकाँचे संदेश किटे यांची फेरनिवड झाली.
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीला पूर्णच सदस्यांची उपस्थिती होती. सभापती पदाकरिता तीन व उपसभापती पदाकरिताही तीन सदस्यांनी नामांकन सादर केले होते. यात सभापतिपदीकरिता काँगे्रसतर्फे कुंदा भोयर, भाजपतर्फे अर्चना मुडे (वानखेडे) व ज्योत्स्रा मंगरूळकर तर उपसभापतीपदाकरिता राकाँच्यावतीने संदेश किटे, सेनेच्यावतीने संतोष सेलुकर व भाजपच्यावतीने फारूख शेख यांनी अर्ज सादर केला होता. यात मतदानाच्यापूर्वी सभापतिकरिता अर्चना मुडे (वानखेडे) व उपसभापतिपदाकरिता असलेले फारूख शेख यांनी अर्ज मागे घेतले. यामुळे काँग्रेसच्या कुंदा भोयर व भाजपच्या ज्योत्स्रा मंगरुळकर यांच्यात सभापती तर राकाँचे संदेश किटे व सेनेचे संतोष सेलूकर यांच्यात उपसभापतिपदाकरिता लढत झाली. सभापतिपदाकरिता झालेल्या मतदानात कुंदा भोयर यांना १३ व ज्योत्स्रा मंगरुळकर यांना नऊ मते मिळाली. यात कुंदा भोयर विजयी झाल्या. उपसभापतिपदाकरिता झालेल्या निवडणुकीत संदेश किटे यांना १३ तर संतोष सेलूकर यांना नऊ मते मिळाली. यात किटे यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार राहुल सारंग यांनी सहकार्य केले.

Web Title: Frontal philosophy in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.