पोलीस ठाण्यासमोर दोन गटात धुमश्चक्री
By Admin | Updated: May 20, 2016 23:57 IST2016-05-20T23:51:54+5:302016-05-20T23:57:20+5:30
श्रीगोंदा : स्वप्नील खेत्रे यास झालेल्या मारहाणीतून उपनगराध्यक्ष अख्तार शेख व आतिक कुरेशी गटात श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर जोरदार हाणामारी झाली.

पोलीस ठाण्यासमोर दोन गटात धुमश्चक्री
श्रीगोंदा : स्वप्नील खेत्रे यास झालेल्या मारहाणीतून उपनगराध्यक्ष अख्तार शेख व आतिक कुरेशी गटात श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर जोरदार हाणामारी झाली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, याप्रकरणी पोलिसात कोणीही तक्रार दिलेली नाही.
कुरेशी व स्वप्नील खेत्रे यांच्यात गुरुवारी सायंकाळी भांडण झाले. त्यानंतर स्वप्नील खेत्रेने उपनगराध्यक्ष अख्तार शेख यांचा आश्रय घेतला. उपनगराध्यक्ष खेत्रे समवेत पोलीस ठाण्यात आले. यावेळी कुरेशी गटाचे समर्थकही आले. हे दोन गट समोरासमोर आल्यानंतर या गटात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हाणामारी झाली. प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. लाठीमारानंतर जमाव पांगला.
दरम्यान, काही वेळानंतर शनी चौकात काही जण तलवारी घेऊन आले. त्यामुळे या भागात घबराटीचे वातावरण पसरले. काही क्षणात येथील व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. पोलीस उपनिरीक्षक अशोक उकिरडे यावेळी हजर होते. दोन्ही गटांपैकी कोणीही तक्रार दिलेली नाही. त्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
दोन्ही गटांनी फिर्याद दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यानंतरच संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल. जर फिर्याद न दिल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसच गुन्हे दाखल करतील.
-साहेबराव कडनोर, पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा