नियमित मानधनसाठी संगणक परिचालकांचा मोर्चा
By Admin | Updated: November 10, 2014 22:48 IST2014-11-10T22:48:07+5:302014-11-10T22:48:07+5:30
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत इपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यात राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रा़पं़ मध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एन्ट्री

नियमित मानधनसाठी संगणक परिचालकांचा मोर्चा
वर्धा : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत इपीआरआय हा प्रकल्प सर्व राज्यात राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रा़पं़ मध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक करण्यात आली; पण त्यांचे मानधन महाआॅनलाईनमार्फत नियमित दिले जात नाही़ यामुळे मानधन नियमित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांना निवेदनातून करण्यात आली. तत्पूर्वी संगणक परिचालक संघटनेच्यावतीने बजाज चौक ते जि.प. कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला़
महाआॅनलाईन ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार कंपनीद्वारे जि.प. स्तरावर एक संगणक प्रोग्रामर, ४ संगणक परिचालक, पंचायत समिती स्तरावर एक संगणक प्रोगामर आणि २ आॅपरेटर आणि एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रा.पं. मध्ये प्रत्येकी एक डाटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक केली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार वरील सर्व पदांना ठरवून दिल्याप्रमाणे मानधन देण्यात येते; पण ग्रा.पं. स्तरावरील संगणक परिचालकांना ठरलेले मानधन दिले जात नाही़ ग्रा़पं़ स्तरावर आॅपरेटरला ८ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय आहे; पण ३५०० ते ४१०० प्रमाणे प्रत्येक आॅपरेटरला मानधन अदा केले जात आहे़ यामुळे सदर कंपनी ग्रा.पं. आॅपरेटरचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यातच आता नव्याने कोणतेही शासन परिपत्रक नसताना महाआॅनलाईनने प्रत्येक महिन्यात ४५० डाटा एन्ट्री करणे सक्तीचे केले आहे़ ते न केल्यास काहीही मानधन मिळणार नाही, असे जाहीर करीत तालुका व जिल्हा समन्वयकांमार्फत सक्तीचे केले आहे.
अनेकांना चार ते पाच महिन्यापसून मानधन देण्यात आलेले नाही़ दर दिवसाची हजेरी युनिटी आय.टी. या सॉफ्टवेअरमध्ये लावली जाते; पण मानधन अदा केले जात नाही. शासनाने एकाच परिपत्रकाद्वारे सर्वांना मानधन ठरवून दिले असताना आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप संगणक परिचालकांनी केला आहे़ यामुळे वर्धा तालुक्यातील प्रत्येक ग्रा.पं. मधील डाटा एन्ट्री आॅपरेटरच्यावतीने कंपनीमार्फत आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी महाआॅनलाईन विरोधात मोर्चा काढण्यात आला़ घोषणाबाजी करीत वर्धा तालुका डाटा एन्ट्री आॅपरेटर युनियनमार्फत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांना निवेदन देण्यात आले़
यावेळी खासदार रामदास तडस यांनीही आंदोलकांना भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या़ लवकरच ही समस्या मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही दिली़ शिष्टमंडळात बिट्टू रावेकर, तुषार राऊत, निलेश वैरागडे, निखिला कहाथे, विपूल शिंदे, विवेक दुधकोहळे, काळे, धमाणे, बावणे, शेंडे, टेकाम आदींचा सहभाग होता. खासदार रामदार तडस हे स्वत: शिष्टमंडळासोबत निवेदन देताना उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)