५०० रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा घात
By Admin | Updated: August 26, 2014 00:09 IST2014-08-26T00:09:30+5:302014-08-26T00:09:30+5:30
केवळ ५०० रुपयांकरिता मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील काजळी येथे घडली. लोखंडी हातोडीने डोक्यावर व मांडीवर वार

५०० रुपयांसाठी मित्रानेच केला मित्राचा घात
कारंजा (घाडगे) : केवळ ५०० रुपयांकरिता मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील काजळी येथे घडली. लोखंडी हातोडीने डोक्यावर व मांडीवर वार करून ही हत्या करण्यात आली. यात स्वत:च्या बचावाकरिता मारेकऱ्याने रचलेल्या नाट्याचे बिंग पोलिसी हिसका दाखविताच फुटले. मृतकाचे नाव मनोज वाकडे असे असून मारेकऱ्याचे नाव रामभाऊ चरपे असे आहे. मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काजळी येथे सुर्यभान सांभारे रा. दत्तवाडी नागपूर यांचे शेत आहे. येथे त्यांचा दुधाचा मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या व्यवस्थापनाकरिता मॅनेजर म्हणून मनोज वाकडे (३९) रा.जाट तरोडी, नागपूर हा गत दहा महिन्यांपासून कार्यरत होता. गत दहा दिवसांपासून याच ठिकाणी जुनी ओळख व मैत्री असल्याने सांभारे याने प्रभाकर रामभाऊ चरपे (३५) रा.मोहाड, ता.नरखेड, जि.नागपूर याला कामावर ठेवले.
पोळा असल्याने रविवारी कामागारांचा पगार झाला; परंतु दहा दिवसांपूर्वीच कामावर आलेला प्रभाकर चरपे याचा पगार झाला नाही. येथील इतर कामगार रात्री घरी निघून गेले. नित्याप्रमाणे मनोज वाकडे हा शेतातच मुक्कामी होता. दरम्यान रात्री मनोज वाकडे व प्रभाकर चरपे यांनी सोबतच जेवण घेतले. प्रभाकर याने जेवणानंतर मनोज वाकडे याला ५०० रुपये उधार मागितले. यावरुन दोघांमध्ये झालेल्या वादात प्रभाकरने एका हातोडीने मनोज याच्या डोक्यावर व मांडीवर घाव घातले. यात रक्ताच्या थारोळ्यात पडून मनोजचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रभाकर वर भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सदर कार्यवाही ठाणेदार विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)