एचआयव्हीची मोफत तपासणी
By Admin | Updated: June 28, 2015 02:35 IST2015-06-28T02:35:29+5:302015-06-28T02:35:29+5:30
मोफत एचआयव्ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये उपलब्ध आहे.

एचआयव्हीची मोफत तपासणी
वर्धा : मोफत एचआयव्ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये उपलब्ध आहे. विविध कंपन्यांनीही एचआयव्ही जनजागृती, कामगाराची तपासणी, औषधोपचार आदी सुविधा पुरविण्याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. नितीन निमोदिया, कार्यक्रम अधिकारी शिवा देवगडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानकर, डॉ. बागेश्वरी पाठक, प्रतिभा शेंडे, रवींद्र्र रोकडे, प्रमोद बहुलेकर, वैशाली मैद, रंजन हुमने, नुरूल शेख, मनीष कुटे आदी उपस्थित होते. डॉ. राठोड यांनी एप्रिल ते मार्चदरम्यान २७ हजार १४० व्यक्तींची तपासणी केली. यात २८९ रुग्ण एचआयव्हीसह जीवन जगणारे आढळले असून १७७ पुरूष व ११२ महिला आहेत. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ४४ एचआयव्हीसह जीवन जगणारे आढळले. ५५ हजार ११ गरोदर मातांच्या तपासणीत १६ गरोदर माता एचआयव्हीसह जीवन जगत असून २८ गरोदर मातांची रुग्णालयात प्रसूति करून औषधोपचार देण्यात आला. २०१४-१५ मध्ये एचआयव्हीग्रस्त व्यक्तींमध्ये वर्धा १०६, हिंगणघाट ४१, आर्वी १७, देवळी १७, कारंजा ७, समुद्रपूर ११, आष्टी ६ व सेलू ९ आहेत. या व्यक्तींना ६० टक्के टीबीची शक्यता असते. १ हजार १७९ नोंदणीकृत टीबी रुग्णांची एचआयव्ही तपासणी केली असता ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. सर्व रुग्णांना औषधोपचार दिल्याचे सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)