वर्धा मार्गाचे चौपदरीकरण
By Admin | Updated: March 31, 2017 01:52 IST2017-03-31T01:52:31+5:302017-03-31T01:52:31+5:30
येथील वर्धा मार्गावर वाहतूक वाढत असून या रस्त्याच्या रूंदीकरणाची गरज निर्माण झाली होती.

वर्धा मार्गाचे चौपदरीकरण
२.२ कि.मी. रस्ता : पाच कोटींचा निधी
आर्वी : येथील वर्धा मार्गावर वाहतूक वाढत असून या रस्त्याच्या रूंदीकरणाची गरज निर्माण झाली होती. ही गरज लक्षात घेता या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याला मंजुरी मिळाली आहे. याकरिता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आर्वीतील हा वर्धा रोड मॉडेल शाळेपर्यंत २.२ किलोमिटर अंतराचा आहे. या २.२ किमी रस्ता आता चार पदरी होणार आहे. यासाठी पाच कोटी रुपये प्रस्तावित असून १० लाख रुपयांचा निधी आर्वीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे.
या मार्गाने सध्या वाहतूक वाढत आहे. वरूड-आष्टी-तळेगाव, आर्वी-पुलगाव-हैदराबाद हा राज्य मार्गाची जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे आर्वीतील वर्धा ते पुलगाव मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. यात कित्येक वेळा अपघाताचाही सामना वाहनधारकांना करावा लागतो. या सर्व वाहतुकीच्या कोंडीतून वाहनधारकांची सुटका व्हावी व आर्वीतील वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वर्धा रोड ते मॉडेल शाळा या २.२ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे चार पदरी रूंदीकरण करण्यात येणार आहे. यात दोन्ही रस्त्याच्या मध्ये डिवायडर राहणार आहे.