एकाच रात्री चार चोऱ्या
By Admin | Updated: July 26, 2015 00:24 IST2015-07-26T00:24:54+5:302015-07-26T00:24:54+5:30
शहरातील मुख्य चौकातील जैन मंदिर परिसरातील गिरीराज ट्रेडर्स व पुरुषोत्तम टावरी यांच्या घरासह अन्य दोन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला.

एकाच रात्री चार चोऱ्या
पुलगावात भीती : रोख लंपास करून धान्याची फेकाफेक
पुलगाव : शहरातील मुख्य चौकातील जैन मंदिर परिसरातील गिरीराज ट्रेडर्स व पुरुषोत्तम टावरी यांच्या घरासह अन्य दोन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला. यात चोरट्यांनी ४३ हजार रुपये रोख, सोन्याचे दागिणे लंपास केले तर दुकानातील धान्याची फेकाफेक केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून शनिवारी सकाळी उघड झाली. या चोरीत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज व रोख लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी ठसे घेतले असले तरी पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नाही. या चोरांना पकडण्याचे आव्हान पुलगाव पोलिसांवर आले असून ते याचा किती दिवसात छडा लावतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
शहरातील कॅम्प व नाचणगाव मार्ग तसेच स्टेशन चौक ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. याच मार्गावर मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, बॅँका, मंदिर आहेत. रात्री पावसामुळे सर्वत्र सामसूम असताना दिगंबर जैन मंदिर येथे चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी नाचणगाव मार्गावरील गिरीराज ट्रेडर्स या अनाज दुकानात मागच्या बोळीतून प्रवेश १० हजार रुपये रोख लंपास केले. काही तेलाचे लहान डबेही लंपास केले. यावेळी चोरट्यांनी तेलाचे पिपे फोडून व धान्याची फेकफाक केल्याचे मन्नु राठी यांनी सांगितले. या चोरीचा पंचनामा करतानाच येथील जीवन वीमा अधिकारी पुरुषोत्तम टावरी यांच्या घराच्या दुसऱ्या माळ्यावरील दार खुले दिसले.
टावरी हे बाहेरगावी गेल्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने मार्गावरील दर्शनी द्वार पोलिसांनी उघडले असता त्यांच्या कार्यालय व घरातील सर्वच दारे उघडी दिसली. या सर्व खोल्यातील लोखंडी व लाकडी कपाट उघडे दिसले. पलंगावर सोन्याच्या दागिण्याचा रिकामा बॉक्स व डब्बे दिसून आले. त्यातील दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कपाटातील चांदीची भांडी कायम असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या घरातून २५ हजार रुपये रोख व १० ग्रॅमची सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. चोरट्यांनी याच परिसरातील जगदीश दुबे यांच्या घरातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; परंतु दाराची कडी न तुटल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू असून परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)