‘त्या’ चार खोल्या पोलीस ठाण्यासाठीच
By Admin | Updated: October 24, 2015 02:07 IST2015-10-24T02:07:31+5:302015-10-24T02:07:31+5:30
शहरातील वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचा चढता आलेख पाहता शहरात दोन नवे पोलीस ठाणे मंजूर झाले आहेत.

‘त्या’ चार खोल्या पोलीस ठाण्यासाठीच
न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय
वर्धा : शहरातील वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीचा चढता आलेख पाहता शहरात दोन नवे पोलीस ठाणे मंजूर झाले आहेत. यातील रामनगर येथील पोलीस ठाणे पालिकेच्या महाराणा प्रताप या शाळेच्या रिकाम्या असलेल्या चार खोल्यात तयार होणार असल्याचा ठराव पालिकेने शुक्रवारी घेतला. यामुळे रामगनर पोलीस ठाणे याच शाळेच्या खोल्यात भरणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पालिकेच्या मालकीच्या असलेल्या या चार खोल्यात सध्या मदर इंग्लिश स्कूल ही खासगी शाळा भरत आहे. त्या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने सदर शाळेकडून खोल्या रिकाम्या करण्यासंदर्भात आदेश दिले. मात्र शाळेकडून या खोल्या रिकाम्या झाल्या नव्हत्या. यावर पालिकेच्यावतीने त्यांना निर्देश दिले तरी काहीच कारवाई झाली नाही. यामुळे पालिकेच्या सभेत या विषयावर चर्चा होवून ती शाळा येथून बंद करून त्या चार खोल्या व परिसर पोलीस ठाण्याकरिता देण्याचा ठराव घेण्यात आल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)
रामनगर येथे पोलीस ठाणे लवकरच
शहराचा वाढता आकार व वाढती गुन्हेगारी यावर आळा घालण्याकरिता वर्धा पोलीस ठाण्यासह दोन आणखी ठाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात एक सावंगी (मेघे) व दुसरे रामनगर येथे मंजूर करण्यात आले. मात्र ठाण्याकरिता जागेचा प्रश्न असल्याने पोलीस विभागाकडून रामनगर परिसरात असलेल्या पालिकेच्या या शाळेतील खोल्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र येथे भरत असलेल्या खासगी शाळेचे संचालक ती जागा रिकामी करून देण्यास तयार नव्हते. यामुळे पालिकेत ठराव घेत त्या खोल्या रिकाम्या करण्यात येणार आहे.